मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत असणारे रिलायन्सचे मुकेश अंबानी आतापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. वर्षाच्या शेवटी त्यांच हे स्थान चीनच्या एका उद्योगपतीनं घेतलं आहे. पत्रकारिता, मशरुम फार्मिंग आणि हेल्थकेअर या क्षेत्रात आपले करिअर केल्यानंतर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात उतरलेले चीनमधील झोंग शानशन आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
झोंग शानशन हे चीनमधील बाटलीबंद पाण्याचा ब्रॅन्ड असलेल्या नांग्फू स्प्रिंग या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी भारताच्या मुकेश अंबानी आणि चीनच्या अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकलंय. झोंग शानशन यांच्या संपत्तीत 2020 साली वाढ होऊन 7780 कोटी डॉलर (5.7 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर इन्डेक्सच्या अहवालानुसार झोंग शानशन हे आता जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही लक्षणीय आहे. चीनच्या बाहेर त्यांना जास्त कोणी ओळखत नाही. कोणतीही राजकीय वा औद्यौगिक पार्श्वभूमी नसलेले झोंग शानशन हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यामुळे त्यांना 'Lone Wolf' म्हटलं जातंय.
झोंग शानशन यांच्या नांग्फू स्प्रिंग या बाटलीबंद पाण्याच्या उद्योगाची हॉंगकॉंग शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच त्यांच्या बिजिंग वान्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्रायजेस कॉर्पोरेशनलाहा मोठा प्रतिसाद मिळाला.
एक वेळ अशी होती की रिलायन्सचे मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी होते. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सच्या शेअर्सच्या किंमतीत घसरण झाली आणि त्याच वेळी नांग्फू स्प्रिंगच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा प्रवाह सातत्यानं वाढत राहिला. झोंग शानशन यांच्या मालकीची बिजिंग वान्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्रायजेस कॉर्पोरेशन ही कंपनी चीनमध्ये कोरोनाच्या लसीच्या निर्मीतीमध्ये भागिदार आहे.
मुकेश अंबानी यांचं जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थान जरी घसरलं असलं तरी त्यांच्या रिलायन्स उद्योगासाठी हे वर्ष फायद्याचं ठरल्याचं दिसतंय. रिलायन्सने या वर्षात अनेक नवे व्यवहार केलेत आणि ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केलाय. त्यामुळे त्यांच्या या वर्षीच्या 1830 कोटी डॉलर (1.3 लाख कोटी रुपये) या नेटवर्थमध्ये वाढ होऊन ते 7690 कोटी डॉलर (5.6 कोटी रुपये) इतकं झालं आहे.
संबंधित बातम्या: