नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज असंख्य फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच या पोस्टच्या गर्दीत सध्या एक फोटो अनेकांच्याच भुवया उंचावत आहे. हा फोटो आहे हवेत तरंगणाऱ्या एका काटा चमच्याचा आणि नूडल्सचा.


आता हा काय प्रकार, असा तुम्हालाही प्रश्न पडला ना? Oleg या सायबेरियाच्या ट्विटर युजरनं हा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर अनेकांच्या नजरा रोखल्या आहेत. फोटो पाहून कोण थक्क होतंय, तर कोणाचा यावर विश्वास बसत नाही. कारण, हा फोटो आहे गोठलेल्या नूडल्स आणि अंड्याचा.


इथं 15 अंशांवर मुंबईचं तापमान आलं तरीही हुडहूडी भरते, पण तिथं सायबेरियामध्ये तर, तापमानाचा आकडा विश्वासही बसणार नाही इतका खाली गेला आहे. Oleg या युजरची पोस्ट पाहता सध्या तिथं तापमानाचा आकडा उणे 45 अर्थात -45 अंश सेल्शिअसवर पोहोचला आहे. त्यामुळं हा आकडा पाहूनच सर्वांची दातखिळी बसत आहे.


सहसा थंडीमुळं पाणी गोठतं हे आपण पाहिलं असेल. पण, इथंतर नूडल्सही गोठू लागले आहेत. त्यामुळं आता सायबेरियाच्या थंडीचा कडाका नेटकऱ्यांना विचार करुनच जाणवू लागला आहे असं म्हणायला हरकत नाही. तिथं तापमानात झालेली घट हा चर्चेचा विषय असतानाच काही नेटकऱ्यांनी यावर धमाल मीम्सही शेअर केले आहेत. यामध्ये कोणी बॉलिवूड चित्रपटांचा आधार घेतला आहे, तर काहींनी उपरोधिक विनोदही केले आहेत.














भारताततही तापमानात घट


तिथं परदेशी राष्ट्रांमध्ये तापमान लक्षणीयरित्या खाली गेलेलं असतानाच इथे भारतातही हिवाळा चांगलाच जोर धरु लागला असल्याचं जाणवत आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्येही सातत्यानं बर्फवृष्टी सुरु आहे. तर, काही भागांत दाट धुक्याची चादर परसली आहे. महाराष्ट्रातही चित्र वेगळं नाही. कुठे गुलाबी तर कुठे बोचरी थंडी असल्यामुळं या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही उत्साहात काही निवडक ठिकाणांच्या रोखानं प्रवास करु लागले आहेत.