वॉशिग्टन: युएस कॅपिटॉलवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेलवर एका आठवड्याची बंदी आणण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकाना हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करत यूट्यूबने त्यावर चिंता व्यक्त केली आहे.
फेसबुक आणि ट्विटरनंतर आता यूट्यूबनेही ट्रम्प यांच्या अकाउंटवर कारवाई केली आहे. यूट्यूबने ट्रम्प यांच्या चॅनेलवर एका आठवड्याची बंदी आणली आहे. ट्रम्प समर्थकांकडून स्टेट कॅपिटॉलवर करण्यात आलेल्या हल्ल्याला ट्रम्प यांनीच प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या काही पोस्ट या नागरिकांच्या भावना भडकावणाऱ्या असल्याचाही आरोप करत यूट्यूबने त्यांच्या काही पोस्ट काढून टाकल्या आहेत.
येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन हे राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर यूट्यूबने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भावना भडकावणारे व्हिडीओ यूट्यूबवरुन काढून टाकण्यात यावेत अशी मागणी अमेरिकेतल्या वेगवेगळ्या नागरी हक्क चळवळी संघटनांच्या वतीने करण्यात आली होती. त्याला यूट्यूबने प्रतिसाद देत ट्रम्प यांचे अनेक व्हिडीओ काढून टाकले आहेत. यूट्यूबने या संबंधीची माहिती देताना सांगितलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी यूट्यूबच्या नियमांचे उल्लघन केलं आहे, त्यामुळे पुढचे सात दिवस त्यांनी कोणताही नवीन कन्टेन्ट अपलोड करता येणार नाही. तसेच नुकतीच घडलेली हिंसा लक्षात घेता यूट्यूबने ट्रम्प यांच्या चॅनेलवर कमेन्ट करण्याची सुविधाही बंद केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट निलंबित करण्यात भारतीय वंशाच्या विजया गड्डेंची महत्त्वाची भूमिका
या आधी ट्विटरनेही डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर कायमस्वरुपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकने आणि इन्स्टाग्रामनेही 20 जानेवारी पर्यंत ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की निर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमापर्यंत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा वापर करु शकणार नाहीत
US Capitol Violence | डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई?, जो बायडन म्हणाले...