वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेत (US Capitol) समर्थकांनी घातलेल्या गोंधळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. युएस कॅपिटलमधील हिसेंनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या समोर येत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "मी जे म्हणालो होतो ते पूर्णपणे खरं होतं असा लोक विचार करत आहेत."


डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटलं की, 'युएस कॅपिटलमध्ये झालेल्या गोंधळामागील खरी समस्या त्यांचं वक्तव्य नव्हतं, तर डेमोक्रेट्स द्वारे 'ब्लॅक लाइव्ह मॅटर'ची आंदोलनं आणि सिएटल तसेच, पोर्टलँडमध्ये झालेल्या हिंसेच्या संबंधात करण्यात आलेली घोषणाबाजी होती.'


महाभियोगाबाबत आज वोटिंग


राष्ट्रपती म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ सात दिवसांपेक्षाही कमी शिल्लक आहे. तसेच संसदेत त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु आहे. प्रतिनिधी सभेत ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाची कारवाई सुरु झाली आहे. बुधवारी यासंदर्भातील प्रस्तावाबाबत मतदान घेण्यात येणार आहे. या महाभियोगाच्या प्रस्तावात मावळत्या राष्ट्रपतींवर 6 जानेवारी रोजी 'राजद्रोहासाठी उत्तेजित' केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.


यामध्ये सांगण्यात आलं आहे की, ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटल बिल्डिंग (संसद परिसर) घुसण्यासाठी तेव्हा उत्तेजित केलं जेव्हा तिथे इलेक्टोरल कॉलेजच्या मतांची मोजणी सुरु होती आणि ट्रम्प समर्थकांच्या गोंधळामुळे ही प्रक्रिया खंडीत झाली. तसेच या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच लोकांचाही मृत्यू झाला होता.


महाभियोगा प्रक्रियेच्या शक्यतांमुळे नाराज


डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये म्हटलं की, महाभियोगाच्या शक्यतेमुळे देशभरातून 'खास राग व्यक्त' केला जात आहे. परंतु, 'हिंसा नाही' नकोय. टेक्सासमध्ये मेक्सिको लगतच्या सीमेवरील भिंतीच्या पाहणीसाठी जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी माध्यमांशी बातचित केली. महाभियोगाच्या प्रश्नावर ट्रंप म्हणाले की, 'ते जे करणार आहेत, ती अत्यंत वाईट गोष्ट आहे. आम्हाला हिंसा नकोय. कधीच नाही.'

महाभियोगाची कारवाई करण्यासाठी जो बायडन यांचा दबाव


अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाब वाढवला आहे. त्यांनी आपल्या एका ट्वीटमध्ये म्हटलंय की अमेरिकन कायदा कोणत्याही शक्तिशाली व्यक्तिच्या बचावासाठी नाही. जो बायडेन म्हणाले की, "अमेरिकन राष्ट्रपती कायद्यापेक्षा मोठे नाहीत. न्याय हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे, कोणत्याही शक्तिशाली व्यक्तीच्या बचावासाठी नाही."


महत्त्वाच्या बातम्या :