Pakistan PM On China Visit : पाकिस्तानचे ( Pakistan ) पंतप्रधान शाहबाज शरीफ दोन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. शाहबाज शरीफ (  Shahbaz Sharif ) यांनी बुधवारी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ( Xi Jinping ) यांची भेट घेतली. यावेळी चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानचा उल्लेख मित्र देश असा केला आहे. पाकिस्तान सध्या चीनसोबत आर्थिक मदतीसाठी बोलणी करत आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे पाकिस्तानला चीनकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. सध्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) संदर्भातील योजनांबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. यावेळी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.


चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रतिक्रिया दिली की, पाकिस्तान आणि चीनमध्ये 60 अरब डॉलरच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पाबाबतच्या योजनांवर चर्चा झाली. पाकिस्तान चीनसोबतची मैत्री आणखी घट्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शरीफ यांच्याकडे चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.


पाकिस्तानमधील चिनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता


शी जिनपिंग यांनी म्हटलं की, 'पाकिस्तानमधील चिनी लोकांच्या सुरक्षेबद्दल मला खूप काळजी वाटते. पाकिस्तान चिनी संस्था आणि सहकार्यासाठी पाकिस्तानला भेट देणाऱ्या चिनी नागरिकांना सुरक्षित वातावरणात काम करण्यासाठी मदत करेल, अशी आशा आहे.'


शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्रपती


चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची नुकतीच तिसऱ्यांदा राष्ट्रपती झाले आहेत. नुकत्याच झालेल्या कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये 69 वर्षीय शी जिनपिंग यांची तिसऱ्या वेळी राष्ट्रपती म्हणून पुन्हा निवड झाली आहे. चीनच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. बलोच नॅशनलिस्ट आर्मी आणि इतर अतिरेकी गटांकडून पाकिस्तानात काम करणाऱ्या चिनी नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहेत. सुमारे दोन महिन्यांत दुसऱ्यांदा जिनपिंग यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.


शाहबाज शरीफ यांचा पहिला चीन दौरा


पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शाहबाज शरीफ यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. पंतप्रधान झाल्यानंतर जिनपिंग यांच्यासोबत शरीफ यांची ही दुसरी भेट आहे. गेल्या महिन्यात उझबेकिस्तानमधील समरकंद येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) बैठकीत त्यांनी जिनपिंग यांची भेट घेतली होती. समरकंदमध्ये शाहबाज यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी सीपीईसी प्रकल्पांवर काम करणाऱ्या शेकडो चिनी कामगारांना संरक्षण देण्याचं आवाहन केलं होतं. आपल्या कामगारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांमुळे आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याची परवानगी देण्यासाठी चीन पाकिस्तानवर दबाव आणत आहे.