Women Protest Against Taliban : अफगाणिस्तानमध्ये ( Afghanistan ) तालिबान सरकार आल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होताना पाहायला मिळत आहे. तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून अफगाणिस्तानी महिलांचं आयुष्य कठीण झालं आहे. तालिबान सरकार सत्तेत आल्यापासून महिलांवर अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तालिबानकडून महिलांच्या शिक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र, महिला त्यांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढत आहेत. तालिबानने महिलांच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. त्यामुळे तेथील तरुणी आणि महिलांनी त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलक तरुणींना तालिबान्यांरडून मारहाण केली जात आहे.


अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांवर दडपशाही 


अफगाणिस्तानातील तालिबान सरकार महिलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींना रोखण्यासाठी तरुणींना मारहाण करण्यासही मागेपुढे पाहत नाही. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, ईशान्य अफगाणिस्तानमधील एका विद्यापीठात विद्यार्थीनींना बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या हक्कांवर दडपशाही सुरू आहे. महिलांना शिक्षण घेण्यापासून रोखलं जात आहे. महिलांच्या नोकरी करण्यास बंदी घातली जात आहे. तालिबानमधील महिलांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.






आंदोलन करणाऱ्या विद्यार्थीनींना मारहाण


अफगाणिस्तानात विद्यार्थीनींना मारहाण केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बदख्शान विद्यापीठाच्या गेटबाहेर तालिबानी पोलिस महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. विद्यापीठाच्या गेटवर विद्यार्थीनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करताना दिसत आहेत. यावेळी तिथे उपस्थित असलेला एक तालिबानी अधिकारी विद्यार्थीनींचा जमाव पांगवण्यासाठी चाबकाचे फटके मारताना दिसत आहे.


तालिबानी सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, त्यांना विद्यापीठात प्रवेश करण्यापासून रोखलं जात आहे. खम्मा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यापीठाचे अध्यक्ष नकीबुल्ला काझीजादा यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचं आश्वासन दिलं आहे.


शिक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत महिला


पूर्व अफगाणिस्तानमधील बदख्शान विद्यापीठातील हा वाद 30 ऑक्टोबर रोजी सुरू झाला. विद्यापीठ प्रशासनाने बुरखा  न घातलेल्या मुलींना वर्गाबाहेर जाण्यास सांगितलं त्यानंतर ह वाद सुरु झाला. यानंतर विद्यार्थिनींनी त्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन सुरू केलं.


फेब्रुवारीमध्ये मुलींना विद्यापीठात प्रवेश मिळाला


तालिबानने 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला. यानंतर मे 2021 मध्ये अफगाणिस्तानमधील अमेरिकन सैन्य हटल्यावर तालिबानने 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा सत्ता मिळवली. तालिबान सत्तेवर आल्यानंतर मुलींना कॉलेजमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली. दरम्यान, फेब्रुवारी 2022 मध्ये तालिबान सरकारने नियमांसह मुलींना महाविद्यालयात प्रवेश देण्यास सहमती दर्शविली.