Crime News Updates: नवी दिल्ली : लग्न झालं, नवऱ्यावर जीवापाड प्रेम केलं, दोघांना एक, दोन नव्हे तर आठ मुलं झाली, पण एवढे दिवस जीवापाड जपलेल्या संसाराला कोणाचीतरी दृष्ट लागलीच. एक दिवस अचानक नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचं सत्य समोर आलं आणि महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. नवऱ्यानं सुखी संसाराचा खेळखंडोबा केल्यामुळे संतापाच्या आगीत ती जळून खाक झाली. पण तीनं नवऱ्याला असं सोडलं नाही, तर पत्नीची फसवणूक केलेल्या धोकेबाज नवऱ्याला तब्बल 200 मिलियन युआन म्हणजेच, भारतीय चलनात सुमारे 200 कोटी रुपयांची भरपाई करावी लागली.  


चीनमधील (China) सिचुआन प्रांतात राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेचा तब्बल 10 वर्षांचा सुखी संसार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पतीची दुसरी पत्नी असल्याचं सत्य तिच्यासमोर उघड झालं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. दोघांनाही आठ मुलं आहेत, तर तिच्या पतीचं वय 61 वर्षांचं आहे. फसवणूक झाल्यानंतर त्यानं भरपाई म्हणून 200 मिलियन युआन (सुमारे 200 कोटी रुपये) मागितले. या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तर दोघांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत. 


नेमकं घडलं काय? 


प्रकरण चीनच्या सिचुआन प्रांतातील आहे. दोघांनाही पाच मुलं आणि तीन मुली आहेत. घडलेल्या घटनेबाबत सांगताना महिला म्हणाली की, तिचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला आहे. वयाच्या 23व्या वर्षी तिची एका व्यक्तीशी सोशल मीडियावर ओळख झाली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं. महिलेचं म्हणणं आहे की, "त्यानं सिंगल असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आमचं नातं कायदेशीर झालं." एका व्हिडीओमध्ये महिलेनं एक मॅरेज सर्टिफिकेट दाखवत 2015 मध्ये तिचं लग्न झाल्याचं सांगितलं. यातील एक तरी मूल नक्कीच यशस्वी होईल, असं तिच्या पतीनं महिलेला सांगितलेलं. यानंतर महिलेनं व्हिडीओमधील प्रमाणपत्रंही दाखवली, ज्यात मुलांचा जन्म सरोगेट मदरच्या माध्यमातून अमेरिकेत झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे.


महिलेनं असा घेतला बदला


महिलेला नवऱ्यानं केलेल्या फसवणुकीबाबत कळाल्यावर तिनं नवऱ्याला थेट कोर्टात खेचलं. त्याच्यावर खटला दाखल केला. पतीला दिलेला सर्व पैसा आणि संपत्ती परत मागितली. या संपत्तीची किंमत 10 मिलियन युआन (सुमारे 11 कोटी रुपये) आहे. पतीला दुसरी पत्नी असल्याचं कळताच महिलेला आणखी एक धक्का बसला. पतीनं परदेशात पळ काढला होता. महिलेनं आता तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबावर खटला दाखल केला आणि दरमहा 28 हजार यूएस डॉलर्सची (सुमारे 23 लाख रुपये) मागणी केली. 


मुलांना सांभाळण्यासाठी या पैशांची गरज असल्याचं तिनं म्हटलं. महिलेच्या दाव्याला उत्तर देताना, तिच्या सासरच्यांनी सांगितलं की, सर्व मुलांचा स्वतः सांभाळ करण्यास तयार आहेत. काही गोष्टी मान्य न झाल्यास आम्ही कायद्याचा आधार घेऊ, असंही ते म्हणाले आहेत. यावर महिलेनं उत्तर दिलं आहे की, ती तिच्या मुलांना इतर कोणाच्याही स्वाधीन करणार नाही. त्यानंतर तिनं त्यांच्या देखभालीसाठी 200 कोटी रुपयांची मागणी केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. अजूनही याप्रकरणाचा खटला सुरू आहे. या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्येही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.