Marburg Virus Update : कोरोना विषाणूच्या (Corona) प्रादुर्भावातून जग अद्यापही सावरलेले नसतानाच, आता एका नव्या विषाणूने लोकांची झोप उडवली आहे. कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगाने पाहिला. कोरोनामुळे अनेक देशांना अनेक महिने लॉकडाऊनला (Lockdown) सामोरे जावे लागले आणि कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाच्या संसर्गामुळे जगातील बहुतांश देशांना आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. बर्‍याच काळानंतर पुन्हा एकदा लोकांचे जीवन कोरोनापासून पुन्हा रुळावर येत होते, मात्र आता 'मारबर्ग' (Marburg) या नवीन विषाणूमुळे लोकांची झोप उडाली आहे.


गेल्या महिन्यात 2 लोकांचा मृत्यू, WHO कडून अलर्ट


स्काय न्यूजनुसार, मारबर्ग व्हायरसमुळे घानामध्ये गेल्या महिन्यात 2 लोकांचा मृत्यू झाला. या दोन्ही लोकांना मारबर्ग व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले. दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन करायला सुरूवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मारबर्ग विषाणूबाबत त्वरित खबरदारी न घेतल्यास या विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती अनियंत्रणात येऊ शकते.


मारबर्ग व्हायरस म्हणजे काय?


मारबर्ग विषाणू हा कोरोनाप्रमाणेच वटवाघळांमुळे होणारा आजार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित प्राण्यापासून मानवांमध्ये विषाणूचा फैलाव झाल्यानंतर, तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित होऊ शकतो. तज्ञांच्या मते, मारबर्ग विषाणूमुळे मारबर्ग विषाणू रोग (MVD) होण्याचा धोका आहे आणि त्याचा मृत्यू 88 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो. माहितीनुसार विषाणू देखील इबोला कुटुंबातील सदस्य आहे. मारबर्गचे संक्रमण हे इबालोपेक्षा वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. 1967 मध्ये या विषाणूचा पहिला प्रादुर्भाव जर्मनीमध्ये दिसून आला.


मारबर्ग व्हायरसची लक्षणे


तज्ञांच्या मते, मारबर्ग व्हायरसने ग्रस्त व्यक्तीमध्ये लक्षणे दिसण्यासाठी 2 ते 21 दिवस लागतात. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि मायल्जिया यांसारखी लक्षणे संक्रमित रुग्णामध्ये दिसू शकतात. यावर वेळीच उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते.


मारबर्ग व्हायरस कसा पसरतो?


तज्ज्ञांच्या मते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त, शरीरातील द्रव जसे की लघवी, लाळ, घाम, विष्ठा, उलट्या इत्यादींच्या संपर्कात येऊन हा संसर्ग इतर लोकांमध्ये पसरू शकतो. इतकेच नाही, तर संक्रमित व्यक्तीचे कपडे आणि बिछाना वापरल्यानेही संसर्ग पसरण्याचा धोका असतो. 


मारबर्ग व्हायरस रोग प्रतिबंध आणि उपचार


तज्ञांच्या मते, मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार म्हणून, त्याला द्रवयु्क्त आहार आणि इलेक्ट्रोलाइट्सवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो, ऑक्सिजन आणि रक्तदाब स्थिती नियंत्रणात ठेवली जाते, याशिवाय संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क टाळावा. जर तुम्ही प्रभावित भागात राहत असाल तर तुमच्या हातात हातमोजे आणि मास्क घालणे आवश्यक आहे. त्याच वेळी, संक्रमित व्यक्तीला वेगळे ठेवणे आवश्यक आहे. या काळात त्याने वापरलेल्या कोणत्याही वस्तूपासून योग्य अंतर राखले पाहिजे.