नवी दिल्ली: कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतानं हालचाली सुरु केल्या आहेत.


भारत आणि इंग्लंडमध्ये आज सचिव स्तरावर प्रत्यार्पणाबाबत चर्चा सुरु झाली आहे. भारतातर्फे केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी तर इंग्लंडच्या वतीनं पात्सी विल्किन्सन यांच्यात ही चर्चा होत आहे.

यादरम्यान विजय मल्ल्यासह 10 फरार आरोपींना भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

61 वर्षीय विजय मल्ल्या गेल्या वर्षभरापासून इंग्लंडमध्ये वास्तव्य करतोय. भारताच्या मागणीनंतर मागील आठवड्यात त्याला स्कॉटलंड पोलिसांनी अटकही केली होती. पण, अवघ्या काही तासातच मल्ल्याची सुटका झाली.

त्यामुळं आता या बैठकीत मल्ल्यासारख्या बड्या धेंडांच्या मुसक्या आवळण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विजय मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडियासह 17 बँकांचं जवळपास 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज थकवलं आहे.

काय आहे प्रकरण?

किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे.

मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती.

काही महिन्यांपूर्वी ईडीने विजय मल्ल्याची 1411 कोटींची मालमत्ता आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील 34 कोटी रुपये, बंगळुरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील 4.5 एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, 27.75 एकर कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे.

संबंधित बातम्या:

उद्योगपती विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक