न्यू यॉर्क : येत्या 100 वर्षात मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल, असं भाकित ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केलं आहे. येत्या काही वर्षात पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य राहणार नसल्यानं माणसाला हे पाऊल उचलावंच लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

'बीबीसी टीव्ही'च्या 'टुमारोज वर्ल्ड' या मालिकेतल्या 'एक्स्पिडिशन न्यू अर्थ' या डॉक्युमेंटरीमध्ये स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे शिष्य जगभ्रमंती करुन माणसाच्या परग्रहावरील वास्तव्याच्या शक्यतेवर भाष्य करणार आहेत.

हवामान बदल, उल्कापात आणि अतिलोकसंख्या यामुळे पृथ्वी भकास होईल. त्यामुळे मानवाला राहण्यासाठी नवा ग्रह शोधावा लागेल, असंही मत त्यांनी मांडलं. आपल्या हातून वेळ निसटून जात आहे. त्यामुळे लवकर हालचाली केल्या नाहीत, तर अनर्थ ओढावू शकतो. मानवाला परग्रहावर वास्तव्य करावंच लागेल असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

माणसानं केलेली प्रगतीच त्याच्यासाठी घातक ठरु शकते, असंही हॉकिंग म्हणाले. माणसाचा वाढलेला वेग, आण्विक शक्ती आणि रासायनिक हल्ल्यांमुळे पृथ्वीचा विनाश आणखी जवळ येईल, असाही दावा त्यांनी केला.

विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणूस परावलंबी होत चालला आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तग धरुन राहण्याची इतर प्राण्यांची कला माणसाने गमावल्याचा दावाही हॉकिंग्ज यांनी केला.