Joe Biden Visit To Kyiv : मागील वर्षभरापासून रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्ध सुरू आहे. रशियाकडून अजूनही युक्रेनवर हल्ले सुरू असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे अचानकपणे युक्रेन दौऱ्यावर आले आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. बायडन यांनी वापरलेल्या धक्कातंत्रामुळे जगभरात चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांची बैठक झाल्यानंतर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
बायडन यांचा अचानक दौरा
राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या युक्रेन दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. बायडन आता युक्रेनची राजधानी किव्हमध्ये दाखल झाल्याने युक्रेनला नव्याने मदत केली जाण्याची शक्यता आहे. अमेरिका युक्रेनच्या पाठिशी असल्याचे बायडन यांनी जाहीर केले आहे. युक्रेनला यापुढेही अशीच मदत करण्यात येणार असल्याचे बायडन यांनी म्हटले. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनीही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीवर आनंद व्यक्त केला आहे. हा अमेरिकेचा युक्रेनला उघड पाठिंबा असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पुतीन यांना ठणकावले
अमेरिकेच्यावतीने या भेटीबाबत एक निवदेन जारी करण्यात आले आहे. रशियासोबत युद्ध सुरू असताना अमेरिका युक्रेनला कशी आणि कोणत्या स्तरावर मदत करणार आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले की, रशियन राष्ट्रपती पुतीन यांना वाटले की ते युक्रेनला सहज पराभूत करतील. पाश्चिमात्य देशांमध्ये एकजूट नाही. मात्र, पुतीन हे चुकीचे ठरले असल्याचे त्यांनी म्हटले. युक्रेनच्या मदतीसाठी आणखी काही घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये शस्त्रास्त्रांपासून ते इतर आवश्यक गोष्टींचा समावेश आहे. या युद्धात रशियाला पडद्याआडून मदत करणाऱ्या सर्व देशांना अमेरिकेने इशाराही दिला आहे.
युक्रेनवर रशियाचे हवाई हल्ले, अमेरिका मदतीला?
रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हवाई हल्ले सुरू आहेत. या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी झेलेन्स्की यांनी मदतीचे आवाहन केले होते. युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे हवी आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शरणागती पत्करणार नसल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले. आता, थेट बायडन युक्रेनमध्ये दाखल झाल्याने अमेरिकेकडून मोठी मदत मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेकडून युक्रेनला एअर सर्व्हिलांस रडार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे युक्रेनला हवाई हल्ल्यांना तोंड देणे सोपं ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: