Donald Trump Announced US Exit From WHO : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी जगातील महासत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेताच, निर्णयांचा धडाका लावला आहे. ट्रम्प यांनी आपल्या निर्णयांनी फक्त अमेरिकेतील नागरिकांचंच नाहीतर संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर त्यांनी अधिकृतपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यामधील सर्वात धक्कादायक आणि अख्ख्या जगाला हादरवणारा निर्णय म्हणजे, अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सदस्यत्वातून बाहेर पडण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.                                                                                                                        


जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच, जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याची घोषणा केल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. ट्रम्प यांनी WHO मधून अमेरिका बाहेर पडत असल्याचं जाहीर करताना एक कारणंही सांगितलं आहे. अमेरिकेनं सांगितलं की, कोरोना महामारीच्या काळात आजाराचं चुकीचं व्यवस्थापन आणि जागतिक आरोग्य संघटना तातडीनं सुधारणा राबवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवला आहे. तसेच, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO अमेरिकेकडून जास्त आणि चीनकडून कमी पैसे घेते असल्याचा दावाही केला.        


78 निर्णय रद्द, 1500 लोकांना माफी


डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर ओव्हल ऑफिसमध्ये पोहोचले. त्यांनी इथे अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली. या काळात त्यांनी बायडन सरकारचे 78 निर्णय एकापाठोपाठ एक थेट रद्द करुन टाकले. यासोबतच त्यांनी पॅरिस हवामान करारातून अमेरिकेच्या माघारची घोषणा केली. ट्रम्प म्हणाले की, आम्ही कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करणार आहोत. सर्वात आधी, मी मागील सरकारनं घेतलेले विनाशकारी निर्णय रद्द करेन. मागचं सरकार हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार होतं.