Donald Trump Inauguration : डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जेडी वेन्स यांनीही उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. अमेरिका फर्स्ट या धोरणानुसार काम करणार असून अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं. यापुढे जगातले सर्वात बलवान लष्कर म्हणून अमेरिकेच्या लष्कराची बांधणी करणार, तसेच मेक्सिकोच्या सीमेवर नॅशनल इमर्जन्सी जाहीर करणार अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. तसेच देशातील ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 


अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सुमारे 200 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर स्थलांतरितासंबंधी कठोर निर्णय घेतले जाऊ शकतात. यासोबतच व्हिसाचे नियमही कडक केले जाऊ शकतात.


ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग, ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि ईलॉन मस्क यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. अमेरिकन मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी त्यांच्या पदाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 100 कार्यकारी आदेश जारी करण्याचे वचन दिले आहे. यापैकी बरेच आदेश बायडेन प्रशासनाने लागू केलेले आदेश बदलण्यासाठी आहेत. 


ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करणार


ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. जेणेकरून देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात येणार आहे. ट्रम्प ड्रग कार्टेल संस्थांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी देखील पावले उचलू शकतात. स्थलांतरित सुरक्षा प्रोटोकॉल धोरणाची थेट पुनर्स्थापना होऊ शकते. 


चीन, कॅनडाच्या वस्तुंवर आयात शुल्क लावणार


सर्वांचे लक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाकडे असेल. कारण  मेक्सिको आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर 25 टक्के शुल्क लागू करणार असल्याचं ट्रम्प यांनी या आधीच जाहीर केलं आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर आधीच लादलेल्या शुल्कामध्ये ट्रम्प यांना 10 टक्के शुल्क जोडायचे आहे. जीवाश्म इंधन प्रकल्पांसाठी नियम लवचिक केले जाऊ शकतात.


डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे की ते ग्रीन न्यू डील संपुष्टात आणतील. महागाई संपवण्यासाठी आणि ऑटोमोबाईल उद्योगाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित करतील.


अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांचा शपथविधी; अमेरिका फर्स्ट ते दहशतवाद्यांना इशारा, पहिल्याच भाषणाने दणाणून सोडलं 


 




ही बातमी वाचा: