वॉशिंग्टन : आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या सैन्याने घेरल्यानंतर बगदादीने स्वत:ला बॉम्बने उडवलं. या आत्मघाती स्फोटात बगदादीसह त्यांची तीन मुलंही ठार झाली आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली. सीरियातील इदबिल प्रांतात एका विशेष ऑपरेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
अमेरिकेने दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहिम हाती घेतली आहे. बगदादीचा खात्मा हे या मोहिमेचं यश आहे. आयसिस आणि इतर दहशतवादी संघटनांचा नायनाट करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, हे यातून दिसून येतं, असं ट्रम्प यांनी म्हटलं. बगदादी आपल्या तीन मुलांसह एका बोगद्यात लपला होता. अमेरिकन सैन्याने बगदादीला घेरलं, त्यावेळी सैन्याच्या हाती लागण्याआधी बगदादीने आपल्या तीन मुलांसह स्वत:ला बॉम्बने उडवलं, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
बगदादी आता निष्पाप पुरुष, महिला, मुलं यांना नुकसान पोहचवू शकणार नाही. अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीने त्याने स्वत:ला संपवलं आहे. त्यामुळे जग आता सुरक्षित आहे. अमेरिकन सैन्याच्या या ऑपरेशनमध्ये आयसिसचे अनेक कमांडरही मारले गेले आहेत, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.
काल ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या सिरियातील कारवाईदरम्यान एक ट्वीट केलं होतं. ट्रम्प यांनी काहीतरी मोठं घडलं आहे, असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटचं उत्तर आता सगळ्यांना मिळालं आहे.