मुंबई : कतारमध्ये हनिमूनसाठी गेलेले आणि एका ड्रग प्रकरणात बळीचा बकरा बनलेले मुंबईतील दाम्पत्य ओनिबा आणि महंमद शरीक कुरेशी दोन वर्षानंतर आज मुंबईत परत येत आहेत. या दाम्पत्याला कतारमध्ये एका ड्रग प्रकरणात दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. पण नार्कोटिस्क कन्ट्रोल ब्युरोने केलेल्या प्रयत्नाने त्यांची आता सुटका झाली असून ते तुरुंगातच जन्मलेल्या आपल्या मुलीसह भारतात येत आहेत. 3 फेब्रुवारीला या दाम्पत्याची निर्दोष सुटका झाली असून कतारमध्ये ड्रग्स प्रकरणात निर्दोष सुटका होणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट समजली जाते.


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणाची सर्व तपासणी करून संबंधित सर्व पुरावे कतारच्या सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवले. त्यानंतर यावर निर्णय सुनावताना कतारच्या न्यायालयाने हे दाम्पत्य निर्दोष असल्याचं सांगितलं आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले. 


नातेवाईकानेच फसवले
मुंबईतील महंमद शरीक कुरेशी आणि ओनिबा कुरेशी हे दाम्पत्य 2019 साली कतारमध्ये हनिमूनसाठी गेलं होतं. या दाम्पत्याला त्याचे नातेवाईक असलेल्या तबस्सुम रियाज कुरेशी यांनी कतारचे फ्री हनिमून पॅकेज दिले होते. परंतु त्यांच्या साहित्यामध्ये त्या व्यक्तीने चार किलो हाशिश ठेवलं होतं. कतारमध्ये गेल्यानंतर या दाम्पत्याच्या साहित्यात हे ड्रग्ज सापडल्याने त्यांना अटक केली आणि या प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेऊन त्यांना दहा वर्षाची शिक्षा आणि एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.


या दाम्पत्याला त्यांच्या नातेवाईकाकडून सांगण्यात आलं होतं की ते पाकिट तंबाखूचे आहे आणि कतारमधील एका मित्राला द्यायचे आहे. ही वस्तुस्थिती कतार पोलिसांना वारंवार सागितली तरी त्यांची यातून सुटका झाली नाही. या दरम्यान, ओनिबा या गर्भवती राहिल्या होत्या आणि त्यांनी तुरुंगातच लहान मुलीला जन्म दिला.  


गेल्या वर्षी या दाम्पत्याने भारतातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला एक पत्र लिहलं आणि या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये एनसीबीने आपल्याला मदत करावी अशीही विनंती केली. 


कतारच्या दूतावासाशी संपर्क
कतारमध्ये ड्रग्ज संबंधित कायदे कडक असून ड्रग्स प्रकरणात निर्दोष सुटका होणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट समजली जाते. गेल्या वर्षी ओनिबा यांचे वडील शकिल अहमद कुरेशी यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला या प्रकरणाचा तपास करुन आपल्याला मदत करावी अशी विनंती एका पत्राद्वारे केली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने या दाम्पत्याचे नातेवाईक असलेल्या तबस्सुम रियाज कुरेशी यांच्या विरोधात पुरावे गोळा केले. 


सर्व पुरावे समोर येताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क केला आणि कतारच्या राजदूतांशी चर्चा केली. त्यानंतर या दाम्पत्याला कतारच्या सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यास सांगण्यात आली आणि त्या ठिकाणी त्यांच्या सुटकेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 


महत्वाच्या बातम्या :