Titan Submersible Debris : अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे (Titanic) अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीतील 5 अब्जाधीशांचे मृतदेह सापडले आहेत. टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन सबमर्सिबल या पाणबुडीचा स्फोट होऊन त्यामधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अटलांटिक महासागरात या पाणबुडीचा स्फोट झाला. समुद्राच्या खोलात उतरून अपघातग्रस्त पर्यटक पाणबुडी टायटनचे अवशेष किनाऱ्यावर आणले जात आहेत. पाणबुडीचे अवशेष बुधवारी 28 जून रोजी कॅनडातील सेंट जॉन्स येथील बंदरात होरायझन आर्क्टिक जहाजातून उतरवण्यात आले.
टायटॅनिक पाहायला गेलेल्या 5 अब्जाधीशांचे मृतदेह सापडले
अमेरिकेच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, मानवी अवशेष अमेरिकेत परत आणण्यात आले आहेत. टायटन सबमर्सिबलचे अवशेष बुधवारी पुन्हा किनाऱ्यावर आणण्यात आले. 18 जून रोजी टायटॅनिक जहाजाचे अवशेष दाखवणारी पर्यटक पाणबुडी टायटनमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात जहाजावरील पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तटरक्षक दलाला अब्जाधीशांचे मृतदेह सापडले आहेत. मृतदेह आणि जहाजाचे अवशेष किनाऱ्यावर आणण्यात आला आहे. मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण आहे.
पाणबुडीचे अवशेष 12,500 फूट खोलीवर
टायटन पाणबुडीचे अवशेष पाण्याखाली सुमारे 12,500 फूट खोलवर होते. हे समुद्राच्या तळावरील टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांपासून सुमारे 1,600 फूट दूर होते. यूएस कोस्ट गार्डने दिलेल्या माहितीनुसार की, उत्तर अटलांटिक महासागरात 18 जून रोजी झालेल्या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी अमेरिका, कॅनडा, फ्रान्स आणि ब्रिटन एकत्र काम करत आहेत.
यूएस कोस्ट गार्ड काय म्हणाले?
यूएस कोस्ट गार्ड अर्थात अमेरिकन तटरक्षक दलाचे मुख्य अन्वेषक कॅप्टन जेसन न्यूबाऊर यांनी तपासाची यांनी सांगितलं की, 'अपघाताचं ठिकाण (Crash Site) मॅप केली गेली आहे. तपासाचा अंतिम अहवाल आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेला दिला जाईल. जगभरातील सागरी क्षेत्रांची सुरक्षा वाढवण्यासाठी आवश्यक शिफारशी करून अशाच प्रकारची घटना रोखणं गरजेच आहे.
कशी घडली घटना?
18 जून रोजी टायटन या पर्यटक पाणबुडीतून पाच अब्जाधीश अटलांटिक महासागरात टायटॅनिक अपघातग्रस्त जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेले होते. पण ही पाणबुडी पाण्यात उतरल्यानंतर अवघ्या काही तासांतच बेपत्ता झाली. त्यानंतर अमेरिका आणि कॅनडाच्या नौदलाकडून या पाणबुडीचा शोध सुरु होता. 22 जून रोजी तटरक्षक दलाला बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले यावरून पाणबुडीचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली.