वॉशिंग्टन : अमेरिकेतील संसदेत ट्रम्प समर्थकांकडून निर्माण करण्यात आलेल्या गोंधळाच्या परिस्थितीनं संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. ज्यानंतर आता जागतिक स्तरावरुन राजकीय नेतेमंडळींनी या प्रकरणी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. या सर्व प्रकारानंतर वॉशिंग्टन डीसीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय जागतिक राजकाणातूनही या घटनेवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.


युकेच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या बोरिस जॉन्सन यांनी या आंदोलनाचा निषेध केला आहे. जागतिक स्तरावर अमेरिकन संघराज्य हे त्यांच्या लोकशाही तंत्रासाठी ओळखलं जातं. पण, आता मात्र हे स्पष्ट झालं आहे की तिथं शांततापूर्ण सत्तापालट झालाच पाहिजे असं त्यांनी ट्विटरवर लिहिलं.


युकेमधील इतरही राजकीय नेतेमंडळींनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली. स्कॉटलंडच्या फर्स्ट मिनिस्टर निकोला स्टर्जन यांनी ही घटना धडकी भरवणारी असल्याचं म्हणत एक ट्विट केलं. तर, युरोपियन काऊन्सिलच्या अध्यक्षपदी असणाऱ्या चार्ल्स मायकल यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हणत युएस काँग्रेसचा उल्लेख लोकशाहीचं मंदिर असा केला.














ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट म़ॉरिसन यांनी ही घटना अतिशय खेदजनक असल्याचं म्हणत अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये घडलेला हा हिंसक प्रकार येत्या काळात तिथं येणाऱ्या शांततापूर्ण बदलाला दर्शवतो ही बाब अधोरेखित केली.


अमेरिकेत नेमकं काय घडलं?


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणूक निकालांबाबत तेथील संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इलेक्टोरल कॉलेजबाबत चर्चा सुरु होती. बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणाही केली जाणार होती. पण, त्याचवेळी ट्रम्प समर्थक कॅपिटल बिल्डिंगमध्ये घुसले, ज्यामुळं संसदेचं कामकाज थांबवावं लागलं. ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंगबाहेर एकच गोंधळ घातला. क्षणार्धातच या आंदोलनाला हिंसक स्वरुप प्राप्त झालं.