नवी दिल्ली: मागील बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर (Elon Musk) एलन मस्क हे नाव अनेकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. व्यवसाय क्षेत्रात अनेक परिसीमा ओलांडत जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी पोहोचलेल्या मस्क यांनी कायमच त्यांच्या कर्तृत्त्वानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आता ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत, ते म्हणजे सढळ हस्ते एका संस्थेला मदत केल्यामुळं.


अमेरिकेतील एका स्वयंसेवील शिक्षण संस्थेला म्हणजेच खान अकॅडमीला मस्क यांनी तब्बल 5 दशलक्ष मिलियन युएस डॉलर्स इतकी घसघशीत मदत केली आहे. ऑनलाईन शिक्षणपद्धतीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मस्क यांनी त्यांच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून ही आर्थिक मदत देऊ केली आहे.


किंबल या आपल्या भावाच्या साथीनं मस्क यांनी 2002 मध्ये या चॅरिटेबल फाऊंडेशनची सुरुवात केली होती. या माध्यमातून ते शिक्षण, अक्षय उर्जा संशोधन, ह्युमन स्पेस एक्स्प्लोरेशन रिसर्च, पेड्रीएट्रीक रिसर्च आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात मोलाचं योगदान देण्यास सुरुवात केली. मानवी जीवनात या गोष्टींचा कशा प्रकारे फायदा होईल, याकडेच त्यांचा कायम कल राहिला.


खान अकॅडमीचे संस्थापक, सलमान खान यांनी सोशल मीडियावर मस्क यांनी केलेल्या मदतीची माहिती देत, याबाबतचा आनंद व्यक्त केला. 'मी फक्त आता एलन मस्क आणि त्यांच्या मस्क फाऊंडेशनमधील प्रत्येकाच्याच नावाचा गाजावाजा करु इच्छितो. खान अकॅडमीला त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीसाठी मी असं करु इच्छितो. त्यांनी नुकतंच अकॅडमीला 5 दशलक्ष युएस डॉलर्सची मदत दिली आहे', असं ट्विट त्यांनी केलं.


मस्क यांनी दिलेल्या मदतीला खान अकॅडमीला विविध स्तरावर मदतीचा हात मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कंटेंट, सॉफ्टवेअर आणि जागतिक स्तरावर असंख्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ही मदत महत्त्वाची भूमिका बजावेल अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.





खान अकॅडमीबाबत थोडक्यात...


ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे या अकॅडमीचा कल असतो. 2008 पासून शैक्षणिक क्षेत्रात या अकॅडमीचं मोलाचं योगदान आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत विविध अभ्यासक्रम व्हिडीओ स्वरुपात सादर केले जातात. अकॅडमीच्या संकेतस्थळावरुन सरावासाठीचे स्वाध्याय आणि शिक्षकांनाही मदत होईल अशी माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संकेतस्थळ आणि खान अकॅडमीचं अॅप वापरणाऱ्यांसाठी ही माहिती आणि शिक्षण सामग्री मोफत उपलब्ध आहे.