US attacks on Iran: आजचं जग सतत तणाव आणि संघर्षाच्या अवस्थेतून जात आहे. एका बाजूला रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) संपण्याचं नाव घेत नाहीये, तर दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि इराण (israel iran war) यांच्यातील परिस्थिती झपाट्याने बिघडत चालली आहे. त्यातच अमेरिकन लष्कराने शनिवारी रात्री B-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर करुन इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला (US attacks on Iran) केलाय. इराणच्या फोर्डो, नातांझ, एसफहान या तीन आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ले केले आहेत. यानंतर इराणने 'युद्ध तुम्ही सुरु केलं आहे, शेवट आम्ही करु. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष्य असेल', अशी धमकी दिली आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावर विपरीत पडसाद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आहे का? अशा चर्चा सध्या रंगत आहेत. महायुद्धाची काही अधिकृत घोषणा असते का? जर असली तर आपल्याला ती कशी कळणार? याबाबत जाणून घेऊयात...
विश्वयुद्धाची व्याख्या काय आहे?
विश्वयुद्ध म्हणजे असे युद्ध ज्यात जगातील अनेक प्रमुख देश थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होतात. आतापर्यंतच्या इतिहासात दोन विश्वयुद्धं झाली आहेत. पहिले विश्वयुद्ध (1914-1918) आणि दुसरे विश्वयुद्ध (1939-1945) झाले होते. या दोन्ही युद्धांची सुरुवात एखाद्या विशिष्ट घटनेने झाली होती, पण हळूहळू संपूर्ण जग त्या संघर्षाच्या भोवऱ्यात सापडले होते. तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात एखाद्या मंचावरून अधिकृत घोषणेसह होईल, असा गैरसमज आहे. आजच्या जगात युद्धं ही गुप्तपणे, सायबर हल्ले, आर्थिक निर्बंध, दहशतवादी कारवाया आणि तंत्रज्ञानाधारित शस्त्रांद्वारे लढली जातात. त्यामुळे अशा युद्धाची सुरुवात कुठल्याही क्षणी होऊ शकते आणि अनेक वेळा लोकांना महिने उलटून गेल्यावर लक्षात येतं की ते युद्धाच्या परिस्थितीत राहत होते.
तिसऱ्या महायुद्धाची कोणती चिन्हं असतील?
तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाल्यास एकाचवेळी अनेक देशांमध्ये युद्ध सुरू होईल, जसं की रशिया विरुद्ध NATO, चीन विरुद्ध तैवान, इराण विरुद्ध इस्रायल. जेव्हा हे सर्व संघर्ष एकाच वेळी तीव्र होतील. जर NATO, QUAD, SCO किंवा इतर मोठे लष्करी संघटनं सक्रियपणे युद्धात उतरले, तर हे मोठं लक्षण असेल. जर एखाद्या देशाने अणुहल्ला केला, तर तो धोकादायक संकेत असेल. जर बँकिंग सिस्टम, विमानतळं, सॅटेलाइट्स आणि पॉवर ग्रिडवर सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढू लागलं, तर तो देखील गंभीर इशारा असेल. जागतिक व्यापार ठप्प होऊ लागला, पेट्रोलियम किंवा धान्यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडू लागल्या, तरीही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात मानली जाऊ शकते.
आजची परिस्थिती काय?
सध्या जग अनेक आघाड्यांवर युद्धासारख्या परिस्थितीचा सामना करत आहे. रशिया आणि युक्रेनमधील सुरू असलेलं युद्ध, तैवानवर चीनची नजर, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र चाचण्या आणि इस्रायल-इराणमधील तणाव हे सर्व जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवत आहेत. केवळ फरक इतकाच आहे की, यावेळी युद्ध केवळ पारंपरिक शस्त्रांनीच नव्हे तर डेटा, अवकाश (space), इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारेही लढलं जाईल. तिसऱ्या महायुद्धासाठी कोणतीही घोषणा होणार नाही.
आणखी वाचा