US attacks on Iran: अमेरिकन लष्कराने शनिवारी रात्री B-2 स्टील्थ बॉम्बर विमानांचा वापर करुन इराणमधील तीन अणुस्थळांवर हल्ला केला. इराणच्या फोर्डो,नातांझ,एसफहान या तीन आण्विक तळांवर अमेरिकेने हल्ले केले. हे तिन्ही आण्विक तळ इराणच्यादृष्टीने (Iran) अत्यंत महत्त्वाचे होते. हे आण्विक तळ (Nuclear sites) जमिनीच्या आतमध्ये असल्याने अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी (US fighter jets) याठिकाणी मासिव्ह ऑर्डिनेस एअर ब्लास्ट श्रेणीत मोडणारे GBU-57A/B बाँब टाकले. या बाँबमध्ये जमिनीच्या आतमध्ये खोलवर संहार करण्याची क्षमता असते. त्यामुळे अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे तिन्ही आण्विक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. यानंतर इराण प्रचंड संतापला आहे. इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन अमेरिकेला इशारा दिला आहे. 'युद्ध तुम्ही सुरु केलं आहे, शेवट आम्ही करु. आता प्रत्येक अमेरिकन आणि त्यांचा जवान आमचं लक्ष्य असेल', अशी धमकी इराणने दिली आहे. अमेरिकेला आता अभूतपूर्व प्रत्युत्तर मिळेल. अमेरिकेचं आजपर्यंत कधी झालं नाही असं नुकसान होईल, असा इशारा इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी दिला आहे. त्यामुळे आता मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. या सगळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतावर विपरीत पडसाद होण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पहाटे इराणच्या तीन आण्विक तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केल्याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर इराण युद्ध थांबवेल आणि शांतता प्रस्थापित करेल, अशी अपेक्षाही ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेला संबोधित केले होते. यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या कामगिरीचे कौतूक केले. अमेरिकी हवाई दलाने अत्यंत अचूकरित्या आणि वेगाने हल्ला केला. अमेरिकन लष्कराने केलेल्या या कामगिरीच्या आसपासही जगातील कोणतेही सैन्य जाऊ शकत नाही. आता अमेरिकन लष्कराला पुन्हा इतक्या मोठ्या क्षमतेचा हल्ला करण्याची वेळ येणार नाही, अशी आशा मी करतो. मात्र, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले.
Iran vs Israel: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींनी उत्तराधिकारी निवडले
गेल्या आठ दिवसांपासून इराण आणि इस्रायल यांचे युद्ध सुरु आहे. इस्रायली लष्कराकडून सातत्याने इराणी अणुशास्त्रज्ञ आणि इराणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मारले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलकडून अयातुल्ला खामेनी यांची हत्या करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे खामेनी यांनी त्यांना काही झाल्यास आपले तीन उत्तराधिकारी निवडले आहेत.
आणखी वाचा
अमेरिकेचा इराणवर निर्णायक हल्ला, खतरनाक 'मदर ऑफ ऑल बॉम्ब'चा वापर, नेमकं काय घडलं?