नवी दिल्ली : भारतात लोकसभा निवडणुका ऐन भरात असताना संयुक्त राष्ट्रांनी 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. जागतिक पातळीवर भारताच्या कूटनीतीला मोठं यश आल्याचं मानलं जात आहे. मसूद आणि त्याला अभय देणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयाचे नेमके काय परिणाम होतील, याचा वेध घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

संयुक्त राष्ट्रांनी मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे त्याच्या संपत्तीवर टाच येणार आहे. विशेष म्हणजे तो कोणत्याच देशातून शस्त्र खरेदी करु शकणार नाही. बाहेरुन फंड मिळणं बंद झाल्याने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडण्यात यश येईल.

भारताने जवळपास एक दशकापूर्वीच मसूद अजहरवर प्रतिबंध घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडला होता. मात्र चार वेळा चीनने खोडा घालता भारताचा हेतू साध्य होऊ दिला नाही. पहिल्यांदा 2009 मध्ये भारतानेच प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने अमेरिका, इंग्लंड, फ्रान्ससह प्रस्ताव सादर केला होता. 2017 मध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. मार्च 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या देशांनी पुन्हा एकदा प्रस्ताव सादर केला.

संयुक्त राष्ट्रांचे सदस्य

चीन, रशिया, यूके, यूएस आणि फ्रान्स हे संयुक्त राष्ट्रांचे कायमस्वरुपी सदस्य आहेत. सध्या 193 देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, व्यापार धोरण आणि मानवाधिकार आणि मानवतावादी मुद्द्यांवर सर्व देश एकत्र आले आहेत. केवळ कोसोवो, पॅलेस्टाईन आणि व्हॅटिकन सिटी हे तीन देश याचे सदस्य नाहीत.

काय होईल परिणाम?

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित झाल्यामुळे मसूद अजहर आता संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमध्ये प्रवास करु शकणार नाही. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशातील अजहरची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त होईल. मसूद अजहर कोणत्याच देशातून शस्त्र खरेदी करु शकणार नाही. कोणत्याच देशातून त्याला फंड मिळू शकणार नाही.
संयुक्त राष्ट्राचा मोठा निर्णय, मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

दहशतवादी संघटना सहकारी संघटनांच्या साथीने कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निधी उभारतात, असा उल्लेख भारताने आपल्या प्रस्तावात केला होता. यामुळे मसूद अजहरला निधी (टेरर फंडिंग) उभारण्यात अडथळे येतील.

पुलवामाचा उल्लेखही नाही

चीनचा विरोध मावळल्यानंतर 'जैश-ए-मोहम्मद' या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं. संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. 'लहान-मोठे सर्व एकत्र आले. संयुक्त राष्ट्रांच्या यादीत मसूद अजहरचं दहशतवादी म्हणून नाव आलं. पाठिंब्यासाठी सर्वांचे आभार.' असं अकबरुद्दीन म्हणाले.


जैश ए मोहम्मदसाठी निधी उभारणे, योजना आखणे, प्रोत्साहन देणे, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव, दहशतवादी कारवायांसाठी भरती करणे या कारणांसाठी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं गेलं आहे. मात्र 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा यामध्ये उल्लेख नाही. खरं तर या हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने स्वीकारली होती. सीआरपीएफचे 40 जवान या हल्ल्यात शहीद झाले होते.