मुंबई : हौसेला मोल नसतं, याचा प्रत्यय स्टार फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिला आहे. रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी कार खरेदी केली आहे. भारतीय चलनानुसार या गाडीची किंमत थोडीथोडकी नव्हे, तब्बल 86 कोटींच्या घरात आहे.
रोनाल्डोच्या फूटबॉलप्रेमासोबतच त्याला असलेला आलिशान गाड्यांचा शौक चाहत्यांना माहित आहे. रोनाल्डोने नुकतीच 'बुगाटी ला वॉईतूर नॉएर' ही जगातील सर्वात महागडी मानली जाणारी कार खरेदी केली. या कारची किंमत 11 मिलियन युरो इतकी आहे.
'बुगाटी ला वॉईतूर नॉएर' या आलिशान स्पोर्ट्स कारला ग्राहक मिळाल्याचा दुजोरा बुगाटीने दिला आहे. मात्र तो ग्राहक रोनाल्डो असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं नाही. स्पॅनिश वृत्तपत्रांनी मात्र याविषयी माहिती दिलेली आहे.
या स्पोर्ट्स कारला 8 लीटर क्षमतेचं टर्बोचार्ज्ड W16 इंजिन आहे. ही कार ताशी 260 मैलाचा वेग धरु शकते. जिनिव्ह मोटर शोमध्ये ही कार पहिल्यांदा सादर करण्यात आली होती. 'बुगाटी' या फ्रेंच लक्झरी कंपनीने 110 व्या वर्धापनदिना निमित्त ही सुपरकार तयार केली.
ही कार चालवण्यासाठी रोनाल्डोला दोन वर्ष वाट पाहावी लागेल. अद्याप कारच्या काही बारकाव्यांवर कंपनी काम करत आहे. रोनाल्डोकडे सध्या मर्सिडीज, रोल्स रॉईस, फरारी, लॅम्बॉर्गिनी, अॅस्टन मार्टिन आणि बेंटली अशा सर्वच टॉप कंपन्यांच्या कार आहेत.
फूटबॉलपटू रोनाल्डोच्या ताफ्यात जगातील सर्वात महागडी कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 May 2019 11:52 AM (IST)
रोनाल्डोने नुकतीच 'बुगाटी ला वॉईतूर नॉएर' ही जगातील सर्वात महागडी मानली जाणारी कार खरेदी केली. या कारची किंमत 11 मिलियन युरो इतकी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -