मुंबई : इन्फ्लुएंझा हा श्वसनाचा संसर्गजन्य प्रादुर्भाव असून, सर्व वयोगटांतील लोकांना याची लागण होऊ शकते. सहव्याधी असलेल्या व्यक्तींना गुंतागुंतीचा धोका अधिक असतो. 2020 च्या एप्रिल ते जून या कालावधीत भारतात तीव्र स्वरूपाच्या श्वसन प्रादुर्भावाच्या रुग्णांची संख्या 778070 होती.  सुदैवाने, यापूर्वी लसीकरणाच्या मदतीने देशाने अनेकविध संसर्गजन्य आजारांवर मात केली आहे. इन्फ्लुएंझा हा लसीकरणाने टाळता येण्याजोगा आजार असून, हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला सहज होणारा ऋतुकालीन विषाणूजन्य श्वसनाचा प्रादुर्भाव आहे. भारतात पावसाळा किंवा कडक हिवाळ्यामध्ये ऋतूकालीन इन्फ्लुएंझा किंवा ‘फ्लू’चा उद्रेक दिसून येतो.


इन्फ्लुएंझा सर्व वयोगटांतील लोकांना होऊ शकतो. आरोग्यसेवा कर्मचारी आणि मधुमेह, मूत्रपिंड, हृदय किंवा यकृताचे विकार, दमा, रक्ताचे आजार किंवा यांसारख्या सहव्याधी असलेले लोक तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेले लोक यांना प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते.  त्यामुळे प्रतिबंध महत्त्वाचा आहे. लहान मुलांसाठी तसेच धोक्याखालील प्रौढांसाठी लसीकरण हा इन्फ्लुएंझा व त्याच्याशी निगडित वाईट परिणाम टाळण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे. फ्लू शॉट अर्थात लशीमुळे फ्लूशी निगडित जटीलतांचा धोका 70 टक्के ते 90 टक्के कमी होतो  आणि डब्ल्यूएचओनेही, सर्व धोक्याखालील गटांसाठी, प्रचलित नवीनतम फ्लू स्ट्रेनचा समावेश असलेल्या, इन्फ्लुएंझाच्या वार्षिक लशीची शिफारस केली आहे. 


लहान मुलांसाठीचे फ्लू शॉट्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, तर प्रौढांमध्ये, अगदी मधुमेह व हायपरटेन्शनसारख्या सहव्याधींनी ग्रस्त प्रौढांमध्येही, इन्फ्लुएंझा लस घेण्याचे प्रमाण कमी आहे.  उदाहरणार्थ, अमेरिकेसारख्या देशातही प्रौढांमध्ये इन्फ्लुएंझा लस घेण्याचे प्रमाण ४६.१ टक्के होते (२०१७-१८) आणि त्याचप्रमाणे, भारतालाही, सहव्याधीग्रस्त प्रौढांमधील, लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी अद्याप मोठे अंतर कापावे लागणार आहे. मधुमेही व्यक्तींमध्ये इन्फ्लुएंझाची लस घेतलेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंती निर्माण होण्याचे प्रमाण, लस न घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत, 56 टक्के कमी आहे तसेच रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही 54 टक्के कमी आहे.  भारत ही आता जगाची मधुमेह राजधानी समजली जात आहे, भारतातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या ७४ दशलक्ष झाली आहे. अशा परिस्थिती लसीकरणाचे प्रमाण वाढल्यास या मोठ्या लोकसंख्येला त्याचा लाभ होणार आहे. प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वांत सुरक्षित व सर्वांत प्रभावी पर्याय आहे.


 इन्फ्लुएंझा हा लसीकरणाने टाळता येण्याजोगा आजार असून, प्रतिबंधातील सुलभता व लाभ हे आजारात निर्माण होऊ शकणाऱ्या गुंतागुंतींच्या तुलनेत बरेच कमी आहेत. इन्फ्लुएंझाचे स्ट्रेन्स दरवर्षी म्युटेट होतात. सध्या प्रसारात असलेल्या विषाणूच्या स्ट्रेनबद्दल डब्ल्यूएचओ सातत्याने मार्गदर्शक तत्त्वे जारी करत असते. हे केवळ लहान मुलांसाठी नाही, तर प्रौढांसाठी महत्त्वाचे आहे. विशेषत: ज्यांना सहव्याधी आहेत, त्यांनी दरवर्षी डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्फ्लुएंझा लस घेणे आवश्यक आहे. 


सध्याचे जागतिक संदर्भ अनेकांना गोंधळात टाकणारे आहेत, इन्फ्लुएंझा व श्वसनाच्या अन्य प्रादुर्भावांची लक्षणे म्हणजेच ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा, डोकेदुखी, नाक गळणे, स्नायूदुखी आदी समान असल्यामुळे हे होते. कोविड-१९ लसीकरण फ्लूपासून संरक्षण करणार नाही आणि फ्लूची लस कोविड-19 चा प्रतिबंध करणार नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. फ्लू लशी आणि कोविड-१९ लशी एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतात, त्या परस्परांच्या सुरक्षितता रूपरेखेवर तसेच परिणामकारकतेवर प्रभाव टाकत नाहीत. 


प्रौढांसाठी लसीकरण केंद्र जानेवारी 2018 मध्ये भारतात स्थापन करण्यात आले आणि असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियाच्या अलीकडील काळातील लसीकरणाच्या शिफारशी या जागरूकता वाढवणे आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवणे यासाठीच्या उपायांप्रमाणे काम करत आहेत. लसीकरण कुटुंब, मित्रमंडळी व समाजातील सदस्यांना अनेक स्तरीय संरक्षण पुरवते. लसीकरणाची व्याप्ती देशभर वाढवण्याच्या माध्यमातून व्यक्ती फ्लूशी निगडित गुंतागुंती टाळू शकतात व आरोग्य व्यवस्थेला सहाय्य करू शकतात.