Ukraine Russia War : युक्रेनवर दिवसेंदिवस रशियाचे लष्करी हल्ले तीव्र होत आहेत. अशा परिस्थितीत काही लोक देश सोडून जात आहेत, तर काही रशियन सैन्यासोबत लढण्यास आणि आपल्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी शस्त्रास्त्रांनी सज्ज होत आहेत. यासाठी बंदुकांच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या आहेत. 


मार्शल लॉ लागू करणाऱ्या युक्रेन सरकारने लोकांना युद्धादरम्यान शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये बंदुकांच्या दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोक नवीन बंदुकांची खरेदी करत आहेत.    


युक्रेनमधील नागरिकांची कागदपत्रे तपासून त्यांना एक एक करून दुकानात जाण्याची परवानगी दिली जात आहे. त्यानंतर लोक बंदुका आणि काडतुसांची खरेदी करत आहेत. आपल्या देशात सुरू असलेले युद्ध आपल्या कुटुंबाच्या दारापर्यंत कधी येईल याची भीती सर्वच युकेनियन नागरिकांना आहे. त्यामुळे हे नागरिक आता रशियाविरोधत लढण्यास तयार झाले आहेत. 


दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष  झेलेन्स्की यांनी देशभरात नो-फ्लाय झोन लागू करण्यास नकार दिल्याबद्दल नाटो देशाच्या नेत्यांवर टीका केली आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसमोर काही अटी ठेवल्या आहेत. युक्रेनमधील डोनेट्स्क हा प्रांत रशियाला दिला तर, हे युद्ध थांबू शकते असे संकेत पुतिन यांनी दिले आहेत. 


रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या दहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अजूनही कोणताच देश मागे हटण्यास तयार नाही. याच दरम्यान पुतिन यांनी काही अटींवर हे युद्ध थांबू शकतं असं म्हटलं आहे. युक्रेनमधील डोनेट्स्क हा प्रांत रशियाच्या ताब्यात देण्यात यावा, या शिवाय युक्रेनमधून नाझीवीदींना हद्दपार व्हावं लागेल. या अटी मान्य केल्या तर हे युद्द थांबू शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत.   


महत्वाच्या बातम्या