Students in Ukraine : रशिया- युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून युक्रेन धगधगतंय. तात्पुरती शस्त्रसंधी झाली असलीतरी युद्ध संपवण्याचं नाव घेत नाही. मागील दहा दिवसात युद्ध संपवण्यात जगभरातील महासत्तांना अपयश आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. पिसोचेनमध्ये अडकेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सराकारने तीन बस पाठवल्या आहेत. या बसच्या मदतीने भारतीयांना Pisochyn मधून युक्रेनच्या बॉर्डरवर (Ukraine border) आणले जाणार आहे. विदेश मंत्रालयाकडून याबाबतची माहिती दिली आहे.
विदेश मंत्रालयाने सांगितले की, Pisochyn आणि खारकीव्ह येथील पुढील काही तासांत सर्व भारतीयांना बाहेर काढणार आहोत. त्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. Pisochyn येथे तीन बस पोहचल्या आहेत. खारकीव्हमध्ये कुणीही भारतीय राहिला नसल्याची माहिती मिळाली आहे. आता सर्व लक्ष सुमीवर असणार आहे. येथे मोठी आव्हाने समोर आसणार आहे. कारण सुमीमध्ये अद्याप युद्ध सुरु आहे. त्यामुळे बस अथवा इतर साधनांची सुविधा करण्यास अडचणी येत आहेत. सुमीसाठी युद्धविरामची स्थिती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
दरम्यान, भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी सुरु केलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेअंतर्गत युक्रेनच्या शेजारी देशातून शनिवारी 15 विशेष विमानांनी सुमारे 3000 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. यामध्ये 12 विशेष नागरी विमाने आणि भारतीय हवाई दलाच्या 3 विमानांचा समावेश आहे. 22 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आलेल्या विशेष विमानांनी आतापर्यंत 13 हजार 700 भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. आतापर्यंत 55 विशेष नागरी विमानांनी भारतात परत आणलेल्या भारतीयांची संख्या आता 11,728 झाली आहे. तर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आतापर्यंत केलेल्या 10 फेऱ्यांतून युक्रेनच्या शेजारी देशांसाठी 26 टन मदत साहित्य नेले आणि 2056 भारतीय नागरिकांना परत आणले.
हवाई दलाच्या सी-17 या प्रकारच्या, अवजड माल वाहून नेऊ शकणाऱ्या 3 विमानांनी काल हिंडन हवाई तळावरून युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये जाण्यासाठी उड्डाण केले आणि ही विमाने शनिवारी सकाळी या तळावर परतली. या विमानांनी रुमानिया, स्लोव्हाकिया आणि पोलंड या देशांतून 629 भारतीय नागरिकांना परत आणले. या विमानांनी जाताना या देशांसाठी भारतातून 16.5 टन मदत सामग्री देखील नेली होती. एक नागरी विमान वगळता इतर सर्व नागरी विमाने आज सकाळी देशात परतली. कोशीचेहून निघालेले हे एक विमान आज संध्याकाळी उशिरा नवी दिल्ली येथे पोहोचेल असा अंदाज आहे. आज भारतीयांना मायदेशी घेऊन येणाऱ्या नागरी विमानांमध्ये बुडापेस्टहून येणाऱ्या 5, सुचावाहून येणाऱ्या 4, कोशीचेहून येणारे 1 आणि झेजोव्ह हून येणाऱ्या 2 विमानांचा समावेश आहे.