Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. दोन देशांमध्ये घनघोर युद्ध सुरु आहे. रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी किव्हच्या उंबरठ्यावर पोहोचलं आहे. राजधानी वाचवण्यासाठी युक्रेन सर्वस्वी प्रयत्न करत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांनी यावेळी राजधानी आणि राजधानीच्या आजूबाजूची महत्वाची ठिकाणे आपल्याकडेच असल्याचे सप्ष्ट केले. तसेच युद्ध नको, शांतता हवी आहे, असे व्होदिमर यांनी सांगितले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार व्होदिमर झेलेन्स्की म्हणाले की,’ राजधानी किव्ह आणि आजूबाजूच्या महत्वाच्या ठिकाणांना वाचवण्याचे सर्वस्वी प्रयत्न करत आहोत. कुणी आम्हाला करण्यासाठी येणार असेल तर येऊ शकता. आम्ही तुम्हाला शस्त्रे देऊ. आपल्याला हे युद्ध संपवायला हवे, शांततेत आपण राहू शकतो.’
एक लाख युक्रेन नागरिकांचे पलायन -
मोठ्या प्रमाणात लोक युक्रेन सोडत आहेत. एएफपी न्यूजच्या वृत्तानुसार, एक लाख युक्रेनच्या नागरिकांनी (Ukrainian citizens) आतापर्यंत देशातून पलायन केले आहे. या सर्वांनी पोलांडमध्ये (Poland) शरणागती घेतली आहे. एएफपी न्यूज एजेन्सीनुसार, पोलांडचे उप गृह मंत्री पावेल जेफर्नकर यांच्या मते, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जवळपास एक लाख युक्रेनच्या नागरिकांनी पोलांडची सीमा पार केली आहे. दरम्यान, युक्रेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत रशियाच्या हल्ल्यात तीन मुलांसह 198 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत -
युद्ध थांबवून चर्चेनं मार्ग काढला जावा अशी मागणी जगभरातून होत असताना एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार रशिया आणि युक्रेन सरकारनं शुक्रवारी चर्चेतून तोडगा काढण्याबाबत संकेत दिले आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी वेळ आणि स्थळ निश्चित करण्याबाबत अद्याप चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे किव्हमधील अधिकाऱ्यांनी आपल्या नागरिकांना आवाहन केलं आहे. दशकातील सर्वात वाईट युरोपीय सुरक्षा संकटात रशियन सैन्याला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी आणि राजधानीचे रक्षण करण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की यांचे प्रवक्ते सर्गेई न्याकिफोरोव यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे की, आक्रमण सुरु झाल्यानंतर चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आशेचं पहिलं किरण दिसू लागलं आहे. सर्गेई न्याकिफोरोव यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे की, युक्रेन युद्धविराम आणन शांततेसाठी चर्चा करण्यासाठी तयार होतं आणि आहे. त्यांनी म्हटलं की, युक्रेन आणि रशियामध्ये चर्चेसाठी स्थळ आणि वेळ निश्चित करण्याबाबत चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine Crisis : युक्रेनमधील अडकलेल्या भारतीयांसाठी एअर इंडियाच्या फ्लाइट्स, पुतिन यांच्याकडून भारतीयांच्या सुरक्षेचे आश्वासन
- Russia Ukraine Crisis : 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांची माहिती
- Russia Ukraine War: 'मैं झुकेगा नही...', युक्रेनची रक्षा करण्यासाठी कीवमध्येच उभा; राष्ट्राध्यक्ष व्होदिमर झेलेन्स्की यांचा व्हिडीओ व्हायरल