Turkey Syria Earthquake : तुर्कीमध्ये (Turkey) सोमवारी झालेल्या भूकंपामुळे सीरियातही (Syria) मोठी हाहा:कार उडाला आहे. सीरियात आतापर्यंत 2100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 1,444 लोकांचा मृत्यू सरकारी नियंत्रण असलेल्या भागांत झाल्याची माहिती मिळत आहे. तर बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सीरियाच्या भूभागात 733 जणांना जीव गमवावा लागला आहे. सीरियातील भूकंपामुळे शेकडो इमारतीही उद्ध्वस्त झाल्यात. भूकंपामुळे वायव्य सीरियातील तुरुंगाच्या भिंतीही कोसळल्या. याचाच फायदा सीरियातील कारागृहात कैद असलेल्या कैद्यांनी घेतला. सीरियाच्या कारागृहातून ISIS च्या 20 दहशतवाद्यांनी पलायन केल्याची माहिती मिळत आहे. 


तुर्कीच्या (Turkey Earthquake) सीमेजवळील राजो येथील तुरुंगात सुमारे दोन हजार कैदी कैदेत आहेत. त्यापैकी सुमारे 1,300 ISIS चे दहशतवादी आहेत. तुरुंगात कुर्दिश सैनिकही आहेत. सीरियातील या तुरुंगावर तुर्की समर्थक गटाचं नियंत्रण आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी तुरुंगाच्या भिंती पडल्या. यानंतर येथील कारागृहातील कैद्यांनी बंड करून कारागृहाचा काही भाग ताब्यात घेतला. 


एएफपी या वृत्तसंस्थेनं तुरुंगातील अधिकाऱ्याच्या हवाल्यानं सांगितलं की, या काळात  ISISचे 20  दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. यापूर्वी डिसेंबरमध्ये आयएसने रक्का येथील एका सिक्योरिटी कॉम्प्लेक्सवर हल्ला केला होता. ISIS च्या दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला उधळून लावताना 6 कुर्दिश सैनिक मारले गेले होते. सीरियामध्ये 2011 पासून गृहयुद्ध सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे 5 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सीरियातील निम्म्या लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत. त्यापैकी अनेकांनी तुर्कीमध्ये आश्रय घेतला आहे. 


2016 मध्ये तुर्की आणि ISIS चे संबंध बिघडले


तुर्की हा पूर्वी इस्लामिक स्टेटचा मित्र मानला जात होता. तुर्कस्तान सीरियातील कुर्दीश सैनिकांना आपला सर्वात मोठा शत्रू मानतो. आतापर्यंत तुर्कीनं त्यांच्यावर अनेक हल्लेही केले आहेत. अशातच इस्लामिक स्टेट कुर्दीश सैनिकांशी लढा देत होते, त्यामुळेच तुर्कीनं इस्लामिक स्टेटला आपल्या सीमावर फारसे निर्बंध लादले नाहीत. तसेच, याच काळात तुर्की इस्लामिक स्टेटची दहशतवादी संघटना म्हणून उल्लेख करणंही टाळत होता. तुर्कीचे माजी अध्यक्ष अहमत दावुतोग्लू यांनी इस्लामिक स्टेटचा दहशतवादी उल्लेख करण्यास नकार दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, "इस्लामिक राज्य हा भ्रमनिरास झालेल्या तरुण मुलांचा गट आहे."


2016 मध्ये इस्लामिक स्टेट आणि तुर्की यांच्यातील संबंध बिघडू लागले, त्यानंतर तुर्कीनं इस्लामिक स्टेट्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली. अजूनही हा संघर्ष सुरूच आहे. तुर्कीच्या अनेक शहरांमधून इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांना अजूनही अटक केली जात आहे. 


तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपानं हाहा:कार माजवलाय 


तुर्कीमध्ये सोमवारी पहाटे 04:17 वाजता भूकंप झाला. त्याची खोली जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होती. भूकंपाचा केंद्रबिंदू गझियानटेपजवळ होता. हे ठिकाण सीरिया सीमेपासून 90 किमी अंतरावर आहे. अशा स्थितीत सीरियातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्केही जाणवले होते. तुर्कीतील भूकंप हा 100 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचं सांगितलं जात आहे. भूकंपामुळे आतापर्यंत दोन्ही देशांतील सुमारे 4000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तुर्की प्रशासनाचे म्हणणे आहे की, आतापर्यंत 5606 इमारती कोसळल्या आहेत. सीरियातील विध्वसांचं भयावह दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमधून पाहायला मिळतंय.