Turkiye Earthquake : आज, सोमवारी (20 फेब्रुवारी) तुर्कीएला पुन्हा भूकंपाचा जोरदार हादरा जाणवला आहे. रिश्टर स्केलवरील त्याची तीव्रता 6.4 इतकी  मोजली गेली आहे. नवीन भूकंपामुळे दक्षिण तुर्कामध्ये आणखी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लताकियात सुमारे 10 सेकंद भूकंपाचे दोन भूकंप जाणवले आहेत. यावेळी लोक हॉटेलमधून बाहेर आले आणि बाहेरील मोकळ्या जागी जमा झाले. अंताक्यामधील भूकंपानंतर अधिक इमारती कोसळल्या आहेत. 


आज आलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या पथकांनी तातडीने घटनेचा आढावा घेतला. प्रशासनही सतर्क झाले असून या धक्क्याने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आहे. अनेकांनी मोकळ्या जागी आसरा घेतला. तूर्तास कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आले नाही. मध्य अंताक्यमध्ये भूकंपानंतर इमारती कोसळल्याचे वृत्त आहे.  दोन आठवड्यापूर्वी आलेल्या भूकंपामुळे अंताक्य मध्ये मोठे नुकसान झाले होते. यामध्ये हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. 'रॉयटर्स'ला  प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपानंतर मदत आणि बचाव पथकाने भूंकपग्रस्त भागाकडे धाव घेतली आहे. एका स्थानिक महिलेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप झाला तेव्हा ती अंताक्या शहरातील एका उद्यानात तंबूखाली होती. काही दिवसांपूर्वी दक्षिणपूर्व सीरिया आणि शेजारच्या तुर्किए देशात 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपामध्ये 45,000 हून अधिक लोक ठार झाले आणि दहा लाखाहून अधिक लोक बेघर झाले  आहेत. 


भारतासह इतर 84 देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू 


6 फेब्रुवारी रोजी तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप आला. याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपानंतर सुमारे 100 हून अधिक आफ्टर शॉक बसले. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारताने NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं. भारतासह इतर 84 देशांच्या बचाव पथकांकडून तुर्की आणि सीरियामध्ये बचावकार्य सुरु आहे. जगभरातून तुर्कीए आणि सीरियाला मदत दिली जात आहे. तुर्कीए आणि सीरियातील भूंकपग्रस्त शहर पुन्हा नव्याने उभी करण्याये आव्हान तुर्कीए सरकारसमोर आहे. 


प्रशासनासमोर मोठं आव्हान


तुर्कीए आणि सीरियामध्ये भूकंपाच्या सहा दिवसांनंतरही बचावकार्य सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगारा हटवला जात असताना अनेक मृतदेह बाहेर काढले जात आहेत. विशेष म्हणजे भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरुप बाहेरही काढण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासोबतच बचावलेल्या नागरिकांना अन्न आणि थंडीपासून संरक्षण देणे, हे सध्या प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.