वॉशिंग्टन डीसी : नवऱ्याने 62 वर्ष मुकबधीर असल्याचे सोंग केल्याचे लक्षात आल्यानंतर बायकोने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे वृत्त गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र फिरत आहे. एबीपी माझा.इनसह अनेक वेबसाईट्स आणि वृत्तवाहिन्यांनी ही बातमी लोकांना दाखवली. परंतु या बातमीनंतर एबीपी माझाच्या टीमने या बातमीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लक्षात आले की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.

बातमीबाबत अशी माहिती समोर आली आहे की, ज्या वेबसाईटने ही बातमी सर्वात अगोदर प्रसिद्ध केली होती, ती वेबसाईट निव्वळ मनोरंजनासाठी आहे. (याच बेवसाईटच्या आधारावर सर्व वेबसाईट आणि वृत्तवाहिन्यांनी बातम्या केल्या)अनेक काल्पनिक बातम्या या वेबसाईटवर असल्याचे वेबसाईटने नमुद केले आहे. त्यामुळे ही वृद्ध दाम्पत्याच्या घटस्फोटाची आणि त्यामधल्या नवऱ्याच्या मुकबधीर असण्याची गोष्ट पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे.

काय होती बातमी?
अमेरिकेतील कनेक्टिकटमधील वॉटरबरी शहरातील 80 वर्षांच्या डोरोथी यांनी 84 वर्षीय पती बेरी डावसन यांच्यापासून काडीमोड घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. घटस्फोटाचं कारण ऐकून कोर्टही अवाक झालं.

62 वर्षांपूर्वी डोरोथी आणि बेरी विवाहबंधनात अडकले होते. या सहा दशकांच्या कालावधीत मिस्टर बेरी यांनी पत्नीसमोर एक अवाक्षरही काढलं नाही. इतकी वर्ष त्यांनी आपण मूकबधीर असल्याचं सर्वांना भासवलं होतं. पतीची भाषा समजावी, यासाठी डोरोथी आणि त्यांची मुलं सांकेतिक भाषा शिकले. तरीही पती आपल्याशी फार संवाद साधत नसल्याची खंत डोरोथी यांच्या मनात होती.

बेरी आणि डोरोथी यांना सहा मुलं, सूना-जावई आणि 13 नातवंडं आहेत. बेरी आजोबांना बोलता-ऐकता येत नाही, यावर सर्वांचा विश्वास बसला होता. मात्र एके दिवशी त्यांचं बिंग फुटलं आणि अख्ख्या कुटुंबाच्या मनात विश्वासघाताची भावना निर्माण झाली.

बायकोचं ऐकावं लागू नये, म्हणून बेरी यांनी मूकबधीर असल्याचं सोंग घेतलं होतं. 62 वर्ष ते त्यांच्या शरीरात इतकं भिनलं, की कोणालाच त्यांच्या खोटारडेपणाची शंकाही आली नाही. मात्र अचानक वस्तुस्थिती समोर आली आणि पत्नीला विभक्त होण्यावाचून पर्याय दिसेनासा झाला.

आपल्या पत्नीला दुखावण्याचा किंवा फसवण्याचा बेरी यांचा हेतू नव्हता, हेच त्यांच्या 62 वर्षांच्या संसाराचं गुपित आहे, असा दावा बेरी यांच्या वकिलाने कोर्टात केला. मात्र डोरोथी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी मानसिक त्रास झाल्याबद्दल नुकसान भरपाई, पोटगी आणि काही वस्तूंची मागणी केली आहे. आता कोर्टात समोरासमोर आल्यावर दोघं काय 'बोलणार' याची कोर्टालाही उत्सुकता असेल.