वॉशिंग्टन : सध्या आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तानची चोहोबाजूने कोंडी होताना पाहायला मिळत आहे. कारण अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळणारं आर्थिक गंगाजळी बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण शस्त्रास्त्र खरेदीसाठी पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत कर्ज स्वरुपात देण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी काँग्रेससमोर आपला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानाला अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदीसाठी मिळणारी आर्थिक मदत कर्ज स्वरुपात बदलावी, अशी शिफारस केली आहे. तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत तब्बल 12 अब्ज डॉलरची कपात केली आहे. भारतासाठी ट्रम्प यांचा हा निर्णय दिलासादायक असून, पाकिस्तानला मोठा दणका असल्याचं मानलं जात आहे.

ट्रम्प प्रशासनानं इतर देशांना फॉरेन मिलिट्री फंडिंगला कर्जमध्ये बदलण्याचा प्रस्ताव दिला असल्याचं, अमेरिकेचे अर्थसंकल्पाचं नियोजन करणाऱ्या कार्यालयाचे संचालकांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं.

ते म्हणाले की, अमेरिकेच्या हिताचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. पण अमेरिकेकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्र खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीला कर्जात रुपांतर करावं, की मदत निधी, यावर अमेरिकेच्या गृहखात्याला निर्णय घ्यायचा आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयामागे अमेरिकेतील सैन्य दलावर हा खर्च करुन सैन्य दलाला अधिकाधिक सुसज्ज करण्याची योजना आहे.

दरम्यान, इस्रायल आणि इजिप्तसारख्या देशांना देण्यात येणाऱ्या मदत निधीत कोणताही बदल केलेला नाही.