नवी दिल्ली : भारतीय सैन्यानं नौशेरामध्ये सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2 करुन पाकच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ काल जारी केल्यानंतर, हडबडलेल्या पाकिस्ताननं उलट्या बोंबा सुरु केल्या आहेत. स्वत: च्याच उद्धवस्त झालेल्या चौक्यांची दृश्यं चित्रीत करुन भारतावर हल्ला केल्याचा कांगावा पाकिस्ताननं सुरु केला आहे.

भारतीय जवानांनी 9 मे रोजी पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईचा व्हिडीओ भारतीय सैन्य दलाने काल जारी केला. या व्हिडीओत घुसखोरीसाठी मदत करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या भारताने काशाप्रकारे उद्ध्वस्त केल्या, हे संपूर्ण जगाने पाहिलं. पण यावर हडबडलेल्या पाकिस्तानने आता स्वत:च्याच उद्ध्वस्त चौक्यांचा व्हिडीओ दाखवून भारतावर हल्ला केल्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.


 

पाकिस्तानी सैन्य दलाने काल रात्री उशीरा रावळपिंडीत पत्रकार परिषद घेऊन, एक व्हिडीओ जारी केला. तसेच 13 मे रोजी पाकिस्ताननं भारतावर हल्ला करुन भारतीय सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.

पण या व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण काल भारतीय सैन्याच्या कारवाईचा व्हिडीओ जारी झाल्यानंतर पाकिस्तान सैन्य दलाने दिलेल्या स्पष्टीकरणात यासंदर्भातील कोणाताही उल्लेख नव्हता. उलट पाकिस्तानी मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं.



गफूर यांनी भारताच्या कारवाईच्या वृत्ताचं खंडन करत, पाकिस्तानच्या एलओसीजवळ नौशेरा सेक्टरमध्ये असलेल्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा आणि पाकिस्तानी सैन्याकडून सर्वसामान्य नागरिकांवर गोळीबार झाल्याचा दावा भारतीय करत आहेत. मात्र हे खोटं आहे, असं आसिफ गफूर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

भारताच्या तपास यंत्रणांनी पाकिस्तानचा हा दावा खोडून काढला आहे. तसेच गरज पडल्यानंतर पाकिस्तानच्या या कांगाव्याचा योग्यवेळी बुरखा फाडण्यात येईल, असं भारतीय सैन्य दलाच्या सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक पार्ट-2'चं कृष्णा खोऱ्याशी कनेक्शन?

घुसखोरीविरोधात भारताचा करारा जवाब, पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त

पाकचा रडीचा डाव, नौशेरातील चौक्या उद्ध्वस्त केल्याच्या दाव्याचा इन्कार