Nightclub Fire : शनिवारी रात्री एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत किमान 50 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोकानी शहरात आयोजित एका हिप हॉप संगीत कार्यक्रमादरम्यान आगीची भीषण घटना घडली. सुमारे 30,000 लोकसंख्या असलेल्या या शहरातील नाईट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप-हॉप जोडी ADN चा संगीत कार्यक्रम सुरू असताना आग लागली. या कॉन्सर्टसाठी क्लबमध्ये 1500 लोक जमले होते. असे मानले जात आहे की कार्यक्रमादरम्यान कोणीतरी क्लबच्या आत फटाके फोडले, ज्यामुळे आग लागली. आग लागल्यानंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही लोक चिरडले गेले. युरोपियन देश नाॅर्थ मॅसेडोनियामध्ये ही घटना घडली.
पंतप्रधान म्हणाले, देशासाठी खूप कठीण दिवस
पंतप्रधान हृस्टिजन मिकोव्स्की यांनी X वर लिहिले की, उत्तर मॅसेडोनियासाठी हा एक कठीण आणि अतिशय दुःखाचा दिवस आहे. इतक्या तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूची भरपाई कधीच होऊ शकत नाही. या कठीण काळात पीडितांचे दुःख कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इमारतीच्या छताला लागलेली आग दिसून येत आहे. अपघातानंतर नाईट क्लबमधून आगीच्या ज्वाळा उसळल्या. आतषबाजीनेच ही आग भडकल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना राजधानी स्कोप्जेसह देशभरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जात आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे, मात्र अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या