जेरुसलेम: इस्त्रायलच्या सुरक्षेमध्ये आता आणखी वाढ होणार असून चारही बाजूने लेजर भिंत लावण्यात येणार आहे. पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी त्या संबंधी माहिती दिली आहे. त्यामुळे शत्रूच्या रॉकेट हल्ल्यांपासून देशाची सुरक्षा होणार आहे. 


पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मंगळवारी एका सुरक्षा परिषदेला संबोधित करताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, इस्त्रायलच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासाठी आपण एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. शत्रूंच्या रॉकेट हल्ल्यापासून इस्त्रायलला असलेला धोका लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून देशाच्या चारही बाजूने लेजर वॉलचे कवच लावण्यात येणार आहे. दक्षिण इस्त्रायलमध्ये एका वर्षाच्या आत या गोष्टीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. 


त्या आधी शत्रूच्या मिसाईलपासून सुरक्षा करण्यासाठी इस्त्रायलने आयर्न डोम डिफेन्स सिस्टिमचा वापर करायला सुरुवात केली आहे. 


लेजर वॉल टेक्नॉलॉजी काय आहे? 
इस्त्रायलकडून वापर करण्यात येणाऱ्या लेजर वॉल टेक्नॉलॉजी संबंधी अद्याप संपूर्ण माहिती समोर आली नाही. पण या टेक्नॉलॉजीचा वापर हा जमीन, हवा आणि आकाशामध्ये करता येणार आहे. त्यामुळे इस्त्रायलचे शत्रू राष्ट्र असलेल्या इराण आणि इतर दहशतवादी संघटनांना हा एक संदेश असल्याचं सांगण्यात येतंय. 


इस्त्रायलच्या या टेक्नॉलॉजीमध्ये आयर्न डोम टेक्नॉलॉजी आणि इतर काही तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लेजर वॉलच्या माध्यमातून आता इस्त्रायलची सुरक्षा अधिक चांगली आणि अत्याधुनिक होणार आहे. 


इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादामुळे पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इराण पुरस्कृत दहशतवादी गटांपासून इस्त्रायलला नेहमी धोका असतो.


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha