मुंबई : मुंबईतील हिपहॉप डान्स ग्रुप 'द किंग्ज'ने अमेरिकन रिअॅलिटी शो 'वर्ल्ड ऑफ डान्स'चं विजेतेपद पटकावलं आहे. 14 जणांच्या या ग्रुपने शानदार परफॉर्मन्सच्या जोरावर परीक्षकांचं मन जिंकलं. वर्ल्ड ऑफ डान्सच्या चषकासह द किंगने एक मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे सात कोटी रुपयांची रक्कमही जिंकली आहे.

अमेरिकेत रविवारी झालेल्या वर्ल्ड ऑफ डान्स शोच्या फिनालेमध्ये कॅनेडियन कन्टेम्पररी डान्सर ब्रायर नोलेट, एली आणि एव्हा या बहिणींची जोडी, व्हीपीप्ज, फिलिपाईन्सचा हिप हॉप ग्रुप, युनिटी एलए, दक्षिण कॅलिफोर्नियातील दहा जणांच्या ग्रुपचा सहभाग होता.


'द किंग्ज' या ग्रुपमधील डान्सरचं वय 17 वर्षांपासून 27 वर्षांपर्यंत आहे. तीन महिने सुरु असलेल्या या शोमध्ये द किंगने आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे परीक्षक आणि चाहत्यांचं मन जिंकलं. जेनिफर लोपेज, नया आणि डेरेक ह्यूग हे वर्ल्ड ऑफ डान्सचे परीक्षक होते. त्यांनी द किंगला पूर्ण गुण दिले.


'द किंग्ज' नावाने प्रसिद्ध असलेल्या या डान्स ग्रुपने हिप हॉपमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे. त्यांच्या संघर्षाची कहाणी 2008 मध्ये मुंबईच्या रस्त्यावरुन सुरु झाली होती. मात्र 'इंडियाज गॉट टॅलेण्ट'च्या तिसऱ्या मोसमाचं विजेतेपद पटकावून यशाची चव चाखली होती. तर 2015 मध्ये ह‍िप हॉप डान्स चॅम्प‍ियश‍िपमध्ये टॉप 3 मध्ये जागा मिळवली होती.