Thai Monks Test Positive For Meth :  थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू आहे. पोलीस आणि सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतरही यावर आळा घालणं त्यांना शक्य होत नाही आहे. येथे अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून लोक त्याचे सेवन करत आहेत. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकतेच थायलंडमध्ये पोलिसांनी एका मंदिरात छापेमारी केली असता तेथील पुजारी मद्यधुंद अवस्थेत आढळले. एका स्थानिक अधिकाऱ्याने 'एएफपी' या वृत्तसंस्थेला सांगितले की, सोमवारी टाकलेल्या छाप्यादरम्यान थायलंडच्या फेचाबून प्रांतातील एका बौद्ध मंदिरातील सर्व पुजारी मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये मुख्य पुजाऱ्याचाही समावेश होता.


फेचबून प्रांताचे Bung Sam Phan जिल्हा दंडाधिकारी बूनलर्ट थिंटापथाई यांनी सांगितले की, मध्य थायलंडमधील बौद्ध मंदिर रिकामे करण्यात आले आहे. कारण तेथील सर्व पुजारी (भिक्खू) ड्रग्सच्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व पुजाऱ्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर मंदिर रिकामी केल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ते कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करू शकत नाहीत. यातच जिल्हा दंडाधिकारी बनलर्ट म्हणाले की, ते लवकरच मंदिरात पुजाऱ्यांची व्यवस्था करतील. जेणेकरून लोक धार्मिक विधी करू शकतील.


पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पुजाऱ्यांनी मेथॅम्फेटामाइन नावाचे ड्रग्ज घेतल्याची पुष्टी झाली आहे. थायलंडमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. युनायटेड नेशन्स ड्रग्ज अँड क्राइम ऑफिसच्या म्हणण्यानुसार, थायलंड हा या ड्रग्जचे सेवन करणारा मुख्य देश आहे. हे ड्रग्ज म्यानमारमधून लाओसमार्गे थायलंडमध्ये आणले जाते. या ड्रग्जच्या एका टॅब्लेटची किंमत अंदाजे 20 बहत (थायलंडचे चलन) म्हणजेच 40 रुपये आहे. अलिकडच्या काळात, संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशात या ड्रग्जचा मोठा साठा अनेक वेळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीचा म्यानमारशी संबंध आहे. मार्चमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने म्यानमारमधून तस्करी केलेले हेरॉईन जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये होती. पोलिसांनी सांगितले होते की, तस्कर म्यानमारमधून मणिपूरमार्गे भारतात ड्रग्ज आणतात. त्यानंतर ते तेथून इतर राज्यात नेले जातात.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Zombie Virus: कोरोनानंतर आणखी एका महामारीची भीती! रशियाच्या शास्त्रज्ञांनी पुन्हा जिवंत केला 48,500 वर्षे जुना 'झोम्बी व्हायरस'