न्यूयॉर्क: अमेरिकेत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्याने भरधाव ट्रकने पादचाऱ्यांना चिरडलं. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी आहेत.


न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहटनमधील वर्ल्ड ट्रेड सेंटर मेमोरियलसमोर ही घटना घडली.

हल्लेखोर हा 29 वर्षीय दहशतवादी आहे. या हल्ल्यानंतर तो ट्रकमधून उडी मारुन पळून जात होता, त्यावेळी पोलीसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांची गोळी लागल्याने तो जखमी झाला, त्यामुळे त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.



पोलिसांच्या मते, पकडलेल्या दहशतवाद्याकडे एक नकली बंदूक आणि एक पॅलेट गनही सापडली आहे. तर काही प्रत्यक्षदर्शींनी पाच-सहा राऊंड गोळीबाराचा आवाजही ऐकला.

दरम्यान, हा दहशतवादी हल्ला कोणत्या संघटनेने केला याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र आयसिसने यापूर्वी अशा पद्धतीने हल्ले केले आहेत. त्यामुळे हा हल्ला आयसिसनेच केला असावा, असं सांगण्यात येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता पुरे झाले, आयसिसला इतरत्र नामोहरम केल्यानंतर, त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या परिवाराच्या दु:खात मी सहभागी आहे. देव आणि तुमचा देश (अमेरिका) तुमच्यासोबत आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/925490503218589696

दरम्यान, मॅटहटन हा तगडी सुरक्षा व्यवस्था असलेला परिसर आहे. मॅनहटन हे 16 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. हे शहर अमेरिकेचं मुख्य आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अमेरिकेचे अनेक रेडिओ, टीव्ही आणि टेलिकॉम कंपन्या याच शहरात आहेत.