महादेवाच्या रुपातील इम्रान खान यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानातील हिंदूंनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या संसदेने हे प्रकरण गांभीर्याने घेत एफआयएकडे याचा तपास सोपवला आहे.
इम्रान खान यांचा महादेवाच्या रुपातील फोटो सोशल मीडियावर व्हायरला करण्यामागे त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानच्या संसदेत बुधवारी (11एप्रिल) रोजी विरोधी पक्ष पीपीपीचे रमेश लाल म्हणाले की, "इम्रान खान यांना महादेवाच्या रुपात सादर करणं गंभीर बाब आहे." तर या मुद्द्यावर संसदेच्या प्रमुखांनी गृहमंत्री तलाल चौधरी यांच्याकडून अहवाल मागितला आहे. "कोणत्याही धर्मातील नागरिकांच्या भावना दुखावणं संविधानाविरोधात आहे," असं रमेश लाल म्हणाले.
दुसरीकडे सोशल मीडियावरही हिंदूनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. "जर पाकिस्तानमध्ये आम्ही समान नागरिक आहोत तर हे काय आहे? इस्लाममध्ये हे तर नाही. या विरोधात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. आम्ही पाकिस्तानी आहे पण सर्वात आधी आम्ही हिंदू आहोत. या फेसबुक पेजविरोधात कारवाई व्हावी," अशी प्रतिक्रिया एका ट्विपलने दिली आहे.