Afghanistan News : चेहरा झाकून टीव्हीवर येण्याच्या तालिबान प्रशासनाच्याआदेशाचा निषेध करत  प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या महिला अँकरनी रविवारी त्यांचे चेहरे झाकून वृत्त प्रसिद्ध केले. तालिबानने गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला निवेदिकांनी कार्यक्रम सादर करताना त्यांचे चेहरे झाकले पाहिजेत. यापूर्वी त्यांना फक्त डोक्यावर स्कार्फ घालणे बंधनकारक होते.  


तालिबान प्रशासनाच्या वतीने महिला टीव्ही निवेदिकांना शनिवारपासून या आदेशाचे पालन करण्यास सांगण्यात आले. मात्र, शनिवारी तालिबानच्या आदेशाला आव्हान देत प्रमुख वाहिन्यांच्या महिला निवेदिकांनी चेहरा न झाकता वृत्त प्रसारित केले. परंतु, रविवारी निवेदिका आणि महिला पत्रकार टीव्हीवर पूर्ण हिजाब आणि चेहरा झाकणारे बुरखा घालून दिसल्या. यावेळी निवेदिकांचे फक्त डोळे दिसत होते.  


टोलोनन्यूज निवेदिका सोनिया नियाझी यांनी एएफपीला सांगितले की,  “तालिबान प्रशासनाचा आम्ही निषेध करत असून आम्ही बुरखा घालण्याच्या विरोधात आहोत. परंतु टोलो न्यूजवर दबाव आणण्यात आला आणि सांगण्यात आले की, जी महिला निवेदिका चेहरा न झाकता पडद्यावर दिसते तिला दुसरे काम द्यावे किंवा कामावरून काढून टाकावे. त्यामुळे आम्हाला बुरखा परिधान करावे लागले. 


मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद अकीफ सादिक मोहाजिर म्हणाले की, महिला निवेदिकांना त्यांच्या नोकरीवरून काढून टाकण्याची अधिकाऱ्यांची कोणतीही योजना नाही. मोहाजिर यांनी एएफपीला सांगितले की, "त्यांना सार्वजनिक मंचावरून काढून टाकण्याचा किंवा त्यांचा काम करण्याचा अधिकार काढून घेण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. माध्यम वाहिन्यांनी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडल्याचा आम्हाला आनंद आहे. 


मे महिन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांनी एक हुकूम जारी केला की सार्वजनिक ठिकाणी महिलांनी त्यांचे शरीर पूर्णपणे, चेहऱ्यासह पारंपारिक बुरख्याने झाकले पाहिजे.


दरम्यान, गेल्या वर्षी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने दावा केला होता की, यावेळची त्यांची सत्ता मागील टर्मपेक्षा स्वॉफ्ट असेल. परंतु, तालिबान आपले वचन पाळताना दिसत नाही, उलट त्यांनी महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. महिलांना सरकारी नोकऱ्या, माध्यमिक शिक्षण आणि त्यांच्या शहरात किंवा अफगाणिस्तानच्या बाहेर एकट्याने प्रवास करण्यास बंदी आहे.