Syria Civil War : पश्चिम आशियातील सीरियामध्ये अध्यक्ष बशर अल-असाद यांची 24 वर्षांची राजवट बंडखोरांनी उलथवून टाकली आहे. हयात तहरीर अल-शाम (HTAS) या बंडखोर संघटनेचा नेता अबू मोहम्मद अल-जोलानी याने राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचा दावा केला. देशातील सरकारी रेडिओ केंद्र आणि टीव्ही चॅनेल्स बंडखोरांनी ताब्यात घेतले आहेत. तर राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांचा ठावठिकाणा कुणालाच लागत नसून ते देश सोडून पळून गेले आहेत.  


तहरीर अल-शाम संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल-जोलानी याने बशर अल असाद यांच्याविरुद्ध बंड करत गृहयुद्धच पुकारलं होतं. कधी काळी अबू मोहम्मद अल-गोलानी अल कायदामध्ये कार्यरत होता. पण 2016 मध्ये त्याने अल-कायदाशी संबंध तोडले आणि स्वतःची संघटना स्थापन केली. 


राष्ट्राध्यक्ष देश सोडून गेले


सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद देश सोडून पळून गेल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्याची पुष्टी सीरियाच्या लष्कराने केल्याचंही रॉयटर्सने म्हटलंय. त्यामुळे आता सीरियातून बशर अल असद यांची राजवट संपुष्टात आली आहे. दरम्यान,  सीरियन पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलालींनी बंडखोरांच्या हाती सत्ता सोपवण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. आपण सीरियातच राहू आणि लोक निवडतील त्याच्यासोबत काम करू असं पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी म्हटलं आहे. 


असद यांचं सरकार बंडखोरांनी उलथवून लावल्यानंतर लोक आनंद साजरा करत असल्याचं दिसून येतंय. पण सीरियातल्या संघर्षामुळे आतापर्यंत साडेतीन लाखांपेक्षा जास्त लोक स्थलांतरित झाले आहेत. अमेरिकाही सध्या सीरियातल्या या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. येत्या काळात सीरियात काय होणार? त्याचे पडसाद पश्चिम आशियात कसे उमटणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरेल. 


Syria War LIVE Updates : सीरियात आतापर्यंत काय घडलं?


- 2011 पासून असाद राजवटीविरुद्ध शांततापूर्ण आंदोलनं.
- असाद राजवटीकडून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न.
- सीरियातील असंतोषात 5 लाखांहून अधिक लोकांचा बळी.
- सीरियातून 1 कोटी 20 लाख लोक बेघर, अन्य देशांत पलायन. 
- रशिया,इराण,इराणी दहशतवादी संघटनांचा असाद यांना पाठिंबा. 
- अमेरिकेच्या पाठिंब्यावर उत्तर आणि पूर्वेचा काही भाग कुर्दीश लोकांच्या ताब्यात. 
- 2016 पासून तहरीर अल-शाम संघटनेचा म्होरक्या अबू मोहम्मद अल-जोलानीचे असादविरुद्ध बंड.
- 30 नोव्हेंबरपासून गोलानीचा अलेपो, इडलिब, हमा वगैरे प्रमुख शहरांवर ताबा.
- अबू मोहम्मद अल-जोलानीने सीरियाची राजधानी दमास्कसवर ताबा मिळवत असाद राजवट संपुष्टात आणली. 
- अमेरिका, रशिया, इराणसह अनेक देशांकडून घडामोडींवर सध्या बारीक लक्ष.