स्वीडनमध्ये राहणारी 24 वर्षीय फराह अलहजहा एका स्थानिक कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यूला गेली होती. मुलाखत संपल्यानंतर मुलाखतकर्त्यांनी तिच्याशी शेकहँड करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने त्यास नकार दिला. त्यामुळे 'इगो दुखावलेल्या' मुलाखतकर्त्यांनी तिला नोकरी न देण्याचा निर्णय घेतला.
'युरोपीयन देश असल्यामुळे स्वीडनमध्ये हात मिळवण्याची पद्धत असू शकते, मात्र मी मुस्लिम धर्माच्या परंपरा मानते. त्यामुळे मी शेकहँड करण्याच्या विरोधात आहे.' असं फराहने म्हटलं. फराहने कोर्टात केस दाखल केली आणि ती जिंकलीसुद्धा.
स्वीडनच्या लेबर कोर्टाने फराहची बाजू मान्य करत कंपनीवर 40 हजार क्रोनर म्हणजेच तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. 'मुलाखतकर्त्यांनी जाणूनबुजून चुकीचं वर्तन केलं. आमच्या देशात लैंगिक आणि धार्मिक समानतेचा आदर केला जातो.' असं कोर्टाने स्पष्ट केलं.
कंपनीने आपला बचाव करताना लैंगिक समानतेची बाजू पुढे केली. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांशी समान वर्तणूक केली जाते. त्यामुळे कुठलाही कर्मचारी शेकहँड करण्यास नकार देऊ शकत नाही, असा दावा कंपनीने केला. 'समानतेचा अर्थ फक्त शेकहँड करणं होत नाही, धर्माच्या कारणास्तव युवतीने नकार दिला होता' असं कोर्टाने स्पष्ट केलं.