Xi Jinping House Arrest Rumor: चीनमधून (China) राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (President Xi Jinping) यांच्याबाबत काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. अर्थातच ही माहिती अफवा असल्याचं देखील बोललं जातं आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याबाबत या अफवा आहेत. चिनी प्रसारमाध्यमांनी या वृत्तांना दुजोरा दिला नसला तरी चीनच्या काही हँडल्सवरून केलेल्या ट्विट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) नजरकैदेत ठेवले आहे.
यासंदर्भात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "या अफवांची चौकशी व्हायला हवी. शी जिंगपिंग बीजिंगमध्ये नजरकैदेत आहेत का? शी जिनपिंग नुकतेच समरकंदमध्ये होते, तेव्हा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी शी यांना पक्षाच्या लष्कराच्या प्रभारीपदावरून काढून टाकल्याचे मानले जात होते. त्यानंतर नजरकैदेची घटना घडली. अफवा उडतच असतात." असं स्वामी यांनी म्हटलं आहे.
जेनिफर झेंग या चिनी मानवाधिकार कार्यकर्त्याने तिच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात दावा केला आहे की पीएलए बीजिंगकडे जात आहे. जेनिफर झेंग यांनी ट्विटरवर लिहिले की, "22 सप्टेंबर रोजी पीएलएची लष्करी वाहने बीजिंगकडे जाताना दिसत आहेत. बी दरम्यान, अफवा पसरली आहे की सीसीपी वरिष्ठांना हटवल्यानंतर शी जिंगपिंग यांना अटक करण्यात आली आहे. त्याला पीएलएच्या प्रमुख पदावरून हटवण्यात आलं आहे, असं जेनिफर यांनी म्हटलं आहे.
चिनी लेखक गॉर्डन चांग यांचंही ट्वीट
चिनी लेखक गॉर्डन चांग यांनी झेंगचा व्हिडिओ रीट्विट करत म्हटलं आहे की, "बीजिंगला जाणाऱ्या लष्करी वाहनांचा हा व्हिडिओ देशातील 59% उड्डाणे आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या तुरुंगात बंद झाल्यानंतर काही वेळातच समोर आला आहे. म्हणजे CCP मध्ये कुठेतरी गडबड झाली आहे."
हे वृत्त मिळालेल्या माहितीच्या आधारे देत आहोत. एबीपी माझा या वृत्ताला दुजोरा देत नाही.