Economic Crisis in Sri Lanka : भारतासाठी महत्त्वाचा आणि शेजारचा देश श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था खचली असल्याची स्थिती असून महागाईने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली असून दुसरीकडे सरकारी तिजोरीदेखील रिकामी होत चालली आहे. 


श्रीलंकेला पुढील 12 महिन्यांत अंदाजे 7.3 अब्ज डॉलरचे देशांतर्गत आणि परदेशी कर्जाची परतफेड करायची असल्याचे ब्रिटीश वृत्तपत्र 'गार्डियन'ने म्हटले आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाँडच्या 500 दशलक्ष डॉलरची रक्कमेची परतफेड करायची आहे. श्रीलंकेकडे नोव्हेंबरपर्यंत 1.6 अब्ज डॉलरचा परकीय चलनाचा साठा होता. 


कोरोना महासाथीचा श्रीलंकेला मोठा फटका बसला. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचा मोठा वाटा आहे. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय, सरकारी पातळीवरून सातत्याने वाढत असलेला खर्च, कर कपात, राज्यांच्या महसुलात घट, परकीय गंगाजळीने गाठलेला नीचांक आणि चीनकडून घेतलेल्या मोठ्या कर्जाची परतफेड आदी महत्त्वांच्या कारणांमुळे श्रीलंकन सरकारसमोरील आर्थिक आघाडीवरील आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. 


श्रीलंका सरकारने देशांतर्गत कर्ज आणि परदेशी कर्जरोखे फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चलन छपाई केली. त्यामुळे देशातंर्गत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. डिसेंबर महिन्यात महागाईचा दर हा 9.9 टक्क्यांहून 12.6 टक्क्यांवर पोहचला. 


डिसेंबर महिन्यातील खाद्यपदार्थांच्या किमतीतील महागाई दर 17.5 टक्क्यांवरून 22.1 टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने दिली. 


पाच लाख लोक गरिबीच्या विळख्यात


कोरोना महासाथ सुरू झाल्यानंतर श्रीलंकेतील 5 लाख नागरीक गरिबीच्या विळख्यात अडकल्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे. वाढत्या महागाई दरामुळे मध्यम वर्गालाही दोन वेळेच्या जेवणाची चिंता सतावत आहे. श्रीलंकेतील अनेक कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास कठीण जात आहे. देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी लष्कराकडे देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. 


भारतासाठी महत्त्वाचा देश 


श्रीलंका हा भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश आहे. भारताला हिंदी महासागरात घेरण्यासाठी चीनकडून श्रीलंकेचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चीनने श्रीलंकेत मोठी गुंतवणूक केली असून प्रचंड कर्जही दिले आहे. चीनने श्रीलंकेला 5 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी श्रीलंकेने चीनकडून आणखी एक अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते.