Petrol Crisis in Sri Lanka : श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. देशातील पेट्रोल संपलं आहे. श्रीलंकेत फक्त एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा शिल्लक आहे. परकीय चलनाचा साठाही संपल्याने श्रीलंकेकडे पेट्रोल खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.  श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीच ही माहिती दिली आहे.


जीवनावश्यक वस्तू न मिळाल्यानं नागरिक चिंतेत
श्रीलंकेचा परकीय चलनाचा साठा संपला आहे. इतर देशांतून पेट्रोल, एलपीजी गॅस, औषध यासारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीही श्रीलंकेकडे पुरेसा पैसा शिल्लक नाही. 15 तास वीज कपात आणि महागाईमुळे नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. 


पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना सांगितलं की, देशाचा खर्च भागवण्यासाठी 2.4 ट्रिलियन श्रीलंकन​रुपयांची गरज आहे. मात्र सरकारला मिळालेला महसूल केवळ 1.6 ट्रिलियन श्रीलंकन​रुपये आहे. त्याची भरपाई म्हणून सरकार श्रीलंकेतील मालमत्ता विकण्याच्या विचारात आहे. आता श्रीलंका सरकारने सरकारी विमान कंपन्या खासगी कंपन्यांना विकण्याचा निर्णय घेतला आहे.


संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला भारताची मदत
श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या गंभीर संकटाचा सामना करत आहे. या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेला भारताने 4,00,000 मेट्रिक टन पेक्षा जास्त डिझेलची बारावी खेप पुरवली आहे. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट करत सांगितले की, भारताकडून श्रीलंकेला बाराव्या खेपेत आणखी 4 लाख मेट्रिक टन इंधनाचा पुरवठा करण्यात आला. सवलतीच्या कर्ज योजनेअंतर्गत भारताकडून डिझेलची नवीन श्रीलंकेत पोहोचली आहे.


श्रीलंकेचे पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी जागतिक बँक आणि एडीबीच्या प्रतिनिधींसोबत देशातील सध्याच्या आर्थिक संकटावर चर्चा केली. यावेळी औषध, अन्न आणि खतांचा पुरवठा या मुद्द्यांवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी सांगितले की, 'देशाला आर्थिक संकटातून वाचवणं हे आमचं उद्दिष्ट आहे. सध्या सरकार सरकारी विमान कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या विचारात आहे.'


एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा
श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी सांगितले की, देशात एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा उपलब्ध आहे. पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिझेलच्या निर्यातीमुळे डिझेलची कमतरता काही प्रमाणात भरून निघेल. मात्र हे संकट दूर करण्यासाठी श्रीलंकेला पुढील काही दिवसांत सुमारे 75 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळणं आवश्यक आहे. 


महत्वाच्या बातम्या