Sri Lanka Crisis : आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेचा पाय आणखी खोलात गेला आहे. श्रीलंकेने आज मोठी घोषणा केली. परदेशी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याची कबुली श्रीलंकन सरकारने दिली. श्रीलंकेने स्वत: लाच डिफॉल्टर असल्याचे घोषित केले. देशाच्या अर्थ मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून श्रीलंकेला बेलआउट पॅकेजची अपेक्षा होती. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे अखेर श्रीलंका सरकारने परदेशी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. 


श्रीलंकेने दिला हा पर्याय


श्रीलंकेच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले की, आम्ही सध्या दुसऱ्या देशांचे कर्ज फेडण्याच्या स्थितीत नाही. कर्ज देणारे देश कर्जावरील व्याज घेऊ शकतात अथवा श्रीलंकेच्या चलनात कर्जाची रक्कम घेऊ शकतात. श्रीलंकेची परदेशी गंगाजळी संपूर्णपणे रिकामी झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे डॉलरमध्ये कर्ज फेडण्यास श्रीलंका सक्षम नसल्याचे म्हटले जात आहे. 


एकूण कर्ज किती?


श्रीलंकेचे एकूण परदेशी कर्ज हे 5100 कोटी डॉलरचे आहे, तर, मागील वर्षी या कर्जाच्या रक्कमेचा आकडा 3500 कोटी डॉलर इतका होता. एका वर्षात श्रीलंकेवरील कर्ज 1600 कोटी डॉलरने वाढले. 


कोणत्या देशाचे किती कर्ज ?


श्रीलंकेवर असलेल्या एकूण परदेशी कर्जांपैकी चीनकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ही 15 टक्क्यांच्या घरात आहे. तर, आशियाई विकास बँकेचे 13 टक्के, जागतिक बँकेचे 10 टक्के, जपानचे 10 टक्के आणि भारताचे 2 टक्के इतके कर्ज आहे. 


श्रीलंकेतील जनता बेहाल


श्रीलंकेत सध्या आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. श्रीलंका सरकारने म्हटले की, त्यांच्याकडे डिफॉल्टर होण्याशिवाय इतर पर्याय राहिलाच नव्हता. देशातील सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल होत आहे. इंधनापासून ते खाद्य पदार्थांचा तुटवडा जाणवत असून महागाई प्रचंड वाढली आहे. वीज निर्मितीदेखील कमी प्रमाणात होत असल्याचे विजेचा तुटवडा जाणवत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: