Pakistan New Prime Minister: पाकिस्तानात शाहबाज शरीफ पर्वाची सुरुवात झाली आहे. त्यांना पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र याच दरम्यान एक अशी घटना घडली आहे, ज्याने सर्वांनाच हसू फुटले आहे. शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करणाऱ्या पाकिस्तानच्या संसदेत ही घटना घडली आहे.


झालं असं की, पाकिस्तानी संसदेत मतदानाची प्रक्रिया सुरू होणार होती. तेव्हा इम्रान खान यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकून वॉकआउट केलं. त्याचवेळी खुर्चीवर बसलेले उपसभापतीही राजीनाम्याच्या घोषणेनंतर सभागृहातून बाहेर पडले. त्यावेळी अध्यक्षपदाची जबाबदारी पाकिस्तान मुस्लिम लीगचे (पीएमएलएन) ज्येष्ठ खासदार अयाज सादिक यांनी घेतली होती. जेव्हा त्यांनी शाहबाज शरीफ यांना नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा आदेश वाचण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्याकडून मोठी चूक झाली.


पंतप्रधान नियुक्तीचा आदेश वाचताना ते म्हणाले, मी मियाँ मोहम्मद नवाज शरीफ….हे बोलताच संपूर्ण सभागृह हसू लागले. खुद्द शाहबाज शरीफही उभे राहिले आणि हसायला लागले. आता चूक अशी झाली की, अयाज सादिक यांना शाहबाज शरीफ यांचे नाव घ्यायचे होते. मात्र त्यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नावाची घोषणा केली. सादिक यांना आपली चूक लक्षात येताच त्यांनी तत्काळ माफी मागितली आणि नवाझ शरीफ यांच्याबद्दल आदरही व्यक्त केला. ते म्हणाले की, मियां मोहम्मद नवाज शरीफ माझ्या हृदयात राहतात.


शाहबाज शरीफ 23वे पंतप्रधान


शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान होताच त्यांनी भारत आणि काश्मीरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही, तोपर्यंत ते शक्य नाही. आम्ही काश्मिरी लोकांना त्यांच्या हातात सोडू शकत नाही. राजनैतिकदृष्ट्या, आम्ही काश्मिरी जनतेला आमचा पाठिंबा देत राहू. 


इतर महत्वाच्या बातम्या: