Imran Khan: पाकिस्तानात इम्रान खान यांचे सरकार पडल्यानंतर आता नवे पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र त्यापूर्वीच इम्रान खान आणि त्यांच्या सहकारी सदस्यांनी संसदेतून वॉकआऊट केले आहे. म्हणजेच नवीन पंतप्रधान निवडण्याच्या प्रक्रियेत इम्रान खान सहभागी होणार नाहीत. तत्पूर्वी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. 


निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार 


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान संसदेत पोहोचले, मात्र त्यानंतर काही वेळातच ते निघून गेले. यानंतर त्यांचे बाकीचे समर्थक सदस्यही संसदेतून बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. यानंतर आता नवीन पंतप्रधान निवडीच्या वेळी सर्व विरोधी पक्षाचे सदस्य संसदेत उपस्थित आहेत. इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या अनेक सदस्यांनी राजीनामे दिले आहेत, तर उर्वरित सदस्यही राजीनामे देत आहेत. खुद्द इम्रान खान यांनी ही माहिती दिली आहे.


शाहबाज शरीफ असतील पाकिस्तानचे नवे पंतप्रधान  


पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानाच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे त्यांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा विरोधकांनी संयुक्तपणे केली आहे. त्यानंतर आता शरीफ यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान होणार आहे. विरोधी पक्षांकडे बहुमत असल्याने शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होऊ शकतात. पंतप्रधान होण्यापूर्वी शरीफ म्हणाले की, आम्ही सूडाच्या राजकारणाला अजिबात प्रोत्साहन देणार नाही, कोणावरही अनावश्यक कारवाई केली जाणार नाही.


यापूर्वी इम्रान खान यांनी देशातील जनतेला संबोधित केले होते. ज्यामध्ये त्यांनी आपल्या सर्व समर्थकांना आवाहन केले आणि रविवारी 10 एप्रिल रोजी रस्त्यावर उतरून निदर्शन करण्यास सांगितले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर गंभीर आरोप करत अमेरिकेच्या मदतीने आपले सरकार पाडले जात असल्याचे म्हटले होते. इम्रान यांच्या आवाहनावर रविवारी त्यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी जोरदार निदर्शने केले होते.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha