Shooting In Texas : अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा असून मशीनगननं शाळेत गोळीबार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर युवकाचा मृत्यू झाला आहे. 


गोळीबारामुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. टेक्सासच्या एका शाळेत झालेल्या गोळीबारात 18 मुलांसह एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील एका प्राथमिक शाळेत एका बंदुकधारी युवकानं गोळीबार केला. ज्यामध्ये शाळेतील 18 मुलांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्लेखोर ठार झाला. 



टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी ही टेक्सासच्या इतिहासातील सर्वात मोठी गोळीबार असल्याचं म्हटलं आहे. हल्लेखोर हा 18 वर्षीय तरुण असून तो गोळीबार करत उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत घुसला, असं सांगण्यात येत आहे. त्यावेळी त्याच्या समोर जे कोणी आलं, त्यांच्यावर त्यानं गोळीबार केला. हल्लेखोराचं नाव साल्वाडोर रामोस असल्याचं सांगितलं जात आहे.  


हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. टेक्सास हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टेक्सासच्या गव्हर्नरशी संवाद साधून परिस्थिती समजून घेतली. बायडन यांनी राज्यपालांना शक्य ती सर्व मदत देण्यास सांगितलं आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एक निवेदन जारी केलं. या निवेदनात म्हटलंय की, "आता बास म्हणजे, बास. आपण कारवाई करण्याची हिम्मत ठेवली पाहिजे."


आतापर्यंतची सर्वात भीषण घटना


टेक्सासच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण गोळीबार होता. टेक्सासच्या उवाल्डे शहरातील या शाळेत 600 मुलं शिकतात. शोक व्यक्त करताना व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. शाळेत घुसून 18 वर्षीय तरुणानं अंदाधुंद गोळीबार केला, हल्लेखोरानं दुसरी, तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या निष्पाप मुलांना लक्ष्य केलं. हल्ला करणारा पोलिसांकडून झालेल्या गोळीबारात मारला गेला.