ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील दोन मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबार झाला त्यावेळी बांगलादेशची क्रिकेट टीम मशिदीमध्येच उपस्थित होती. सुदैवाने बांगलादेशच्या सर्व खेळाडूंना आणि इतर उपस्थितांसह सुखरुप मशिदीबाहेर आणण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं आहे.
अलनूर आणि निनवूड या मशिदींमध्ये हा गोळीबार झाला आहे. चार हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या चारही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे.
चार हल्लेखोरांपैकी स्कॉट मॉरिसन हा ऑस्ट्रेलियाचा नागरिक असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे. या हल्ल्याच निषेध करत राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच अनेक ऑस्ट्रेलियातील अनेक सरकारी कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्धावर उतरवला आहे.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, न्यूझीलंडच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. न्यूझीलंड हेरॉल्ड वृत्तपत्राच्या माहितीनुसार, दोन मशिदींवरील हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
बांगलादेशचा खेळाडू तमिम इक्बालने ट्वीट करत घटनेची माहिती दिली आहे. "बांगलादेशचा संपूर्ण संघ सुरक्षित आहे. अत्यंत संघर्षमय आणि भीतीदायक अनुभव होता."
बांगलादेशची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. शनिवारी दोन्ही संघामध्ये तिसरा कसोटी सामना ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येणार होता. मात्र सामन्याआधीच्या या घटनेमुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.