इस्लामाबाद : नवाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर आता शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. शाहबाज शरीफ हे नवाज शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत.


पाकिस्तान मुस्लीम लीग (एन) च्या बैठकीत पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. शाहबाज हे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत.

नवाज शरीफ यांची उचलबांगडी

नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं आहे. पनामागेट प्रकरणात अडकलेल्या नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तसंच अर्थमंत्री इशाक दार यांनाही पदावरुन हटवलं आहे.

पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 11:30 वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि दुपारी 12.30 च्या सुमारास न्यायालायने निकाल दिला.

पनामा पेपर्स काय आहे?

पनामा पेपर्स सध्याचा जगभरात टॉप ट्रेडिंग टॉपिक आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.

11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.

यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.