मुंबई : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानाला थेट इशारा दिला असून हल्लेखोरांना सोडणार नसल्याचेही म्हटले. देशभरातही या घटनेनं संतापाची लाट उसळली असून सोशल मीडियावरही तो संताप पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही व्हिडिओच्या माध्यमातून भारतावर गरळ ओकताना दिसून येत आहे. नुकतेच त्याने अटारी वाघा बॉर्डरवर जाऊन पाकिस्तान सैन्याचं मनोबल वाढवलं. मात्र, भारतीय सैन्य दलाबद्दल अपशब्द वापरल्याने त्याच्याविरुद्धही संताप व्यक्त होत आहे. टीम इंडियाचा माजी फलंदाज (Shikhar dhawan) शिखर धवनने शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अजून किती खालची पातळी गाठशील, अशा शब्दात गब्बरने आफ्रिदीला चपराक लगावली आहे.
शाहिद आफ्रिदीने 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आधी भारताकडे पुरावे मागितले. पाकिस्तानने हा हल्ला केल्याचे पुरावे मागितल्यानंतर तो व्हिडिओच्या माध्यमातून भारत व सैन्य दलाबाबत गरळ ओकत आहे. त्यावरुन, आता शिखर धवनने त्याला चांगलंच झोडपलं आहे. ''कारगिमध्येही हरवलं होतं, आधीच एवढी खालच्या पातळीवर गेले आहात, अजून किती खालची पातळी गाठणार. विनाकारण कमेंट पास करण्यापेक्षा आपल्या देशाच्या प्रगतीसाठी डोकं लावा हे कधीही चांगलं. शाहिद आफ्रिदी, आम्हाला आमच्या भारतीय सैन्य दलाचा अभिमान आहे, जय हिंद, भारत माता की जय....'' असे ट्विट शिखर धवनने केलं आहे. शिखर धवननने वाघा बॉर्डरवर येऊन चमकोगिरी करणाऱ्या शाहिद आफ्रिदीला जोरदार टोला लगावला. धवनच्या या ट्विटला आफ्रिदीनेही प्रत्युत्तर दिलंय. चावरो जीत हार को, आओ तुम्ही चाय पिलाता हूँ शिखर... असा रिप्लाय आफ्रिदीने दिला आहे. त्यामुळे, दोन देशातील तणावावरुन आता दोन क्रिकेटर्सही भिडल्याचं दिसून येत आहे.
भारतीय सैन्य दलाबद्दल अपशब्द, शाहिद आफ्रिदीचा व्हिडिओ व्हायरल
शाहिद आफ्रिदीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये शाहिद आफ्रिदीने भारतावर मोठा आरोप केला आणि म्हटले, "दहशतवादी एक तास तिथे होते. आणि तुमच्याकडे 8 लाख सैन्य आहे, पण तोपर्यंत कोणीही आले नाही आणि जेव्हा ते आले तेव्हा 10 मिनिटांत त्यांनी पाकिस्तानला आरोपी ठरवले. ते स्वतःच लोकांना मारतात आणि नंतर ते स्वतःच त्यांचे व्हिडिओ दाखवतात आणि म्हणतात की, ते जिवंत आहेत." असे शाहिद आफ्रिदीने म्हटले होते. त्यानंतर, त्याचा आखणी एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, काश्मीरमध्ये तुमची 8 लाख फौज आहे, तरीही हे झालं ते झालं करता. म्हणजे, नालायक आहात, बिनकामी आहात.. असे आफ्रिदीने या व्हिडिओत म्हटले आहे. शिखर धवनने याच वक्तव्याचा संदर्भ घेत शाहिद आफ्रिदीवर स्ट्राईक केलाय.
हेही वाचा
आधी ठाकरे बंधु एकत्र येऊ द्या, मग...; रोहित पवारांचं सूचक विधान, महायुतीबद्दलही मोठं भाकीत